मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यात धुमाकूळ माजवणाऱ्या अल्झारी जोसेफला दुखापतीमुळे माघार परतावे लागले. पहिल्या सामन्यातील विक्रमी कामगिरी वगळता जोसेफला उर्वरित सामन्यात प्रभाव पाडता आला नाही. त्यात दुखापतीमुळे त्याला संपूर्ण आयपीएल सामन्यांना मुकावे लागले. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील एक गोलंदाज कमी झाला. मात्र, मुंबई इंडियन्सने ही उणीव भरून काढताना दक्षिण आफ्रिकेच्या ब्युरन हेन्ड्रीक्सला करारबद्ध केले आहे. आयपीएलमधील उर्वरित सामन्यात तो मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणार आहे.
अल्झारीच्या जागी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या हेन्ड्रीक्सने दक्षिण आफ्रिकेकडून दोन वन डे आणि 10 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ट्वेंटी-20 त त्याने 16 विकेट्स घेतल्या आहेत आणि 4 बाद 14 धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सशी येत्या शुक्रवारी होणार आहे. मुंबई इंडियन्स सध्या 10 सामन्यांत 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.