मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्या पराभव पत्करावा लागला. पण पराभव झाल्यानंतरही मुंबईच्या युवराजच्या खेळीने मात्र सर्वांची मनं जिंकली. युवराज संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. त्याची अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. पण तरीही संघाच्या मालकिण नीता अंबानी यानी मात्र युवराजचा खास सत्कार केला.
मुंबईने पहिला सामना गमावला. पण या सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या मुंबईच्या दोन खेळाडूंचा नीता अंबानी यांनी खास सत्कार केला. यामध्ये पहिला क्रमांक युवराजचा होता, तर दुसरा क्रमांक होता सामन्यात तीन बळी मिळवणाऱ्या मिचेल मॅक्लेघनचा. नीता अंबानी यांनी या दोन्ही खेळाडूंना संघाचे बॅच देत सन्मान केला.
दिल्ली कॅपिटल्सच्या रिषभ पंतची तुफानी खेळी वानखेडेवर पाहायला मिळाली. पंतने फक्त २६ चेंडूंमध्ये सात चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद ७७ धावांची खेळी साकारली. पंतच्या या दमदार खेळीच्या जोरावर दिल्लीला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात २१३ धावा करता आल्या. दिल्लीच्या २१३ धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी चांगली फटकेबाजी केली. पण त्यांना मोठ्या खेळी साकारता आल्या नाहीत. मुंबईच्या संघात आलेल्या युवराज सिंगने मात्र दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत मुंबईचे आव्हान जीवंत ठेवले होते. पण युवराजची ही झुंज अपयशीच ठरली आणि मुंबईला दिल्लीकडून ३७ धावांनी पराभव पत्करावा लागला. युवराजने ३५ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली.
निवृत्तीच्या निर्णयाबाबत युवीनं घेतला सचिन तेंडुलकरचा सल्ला, म्हणाला...
युवराजला आयपीएलच्या मागील हंगामात समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळेच 2019च्या लिलावात त्याला संघात घेण्यात कोणत्याच संघाने फार रस दाखवला नाही. पहिल्या टप्प्यात अनसोल्ड राहिल्यानंतर अखेरच्या टप्प्यात युवीला 1 कोटीच्या मुळ किमतीत मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. युवीनंही पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावून आपली निवड योग्य असल्याचे सिद्ध केले.
तो म्हणाला,''मागील दोन वर्ष चढ उतारांचे होते. मला क्रिकेट खेळायला आवडते आणि त्याचा मनमुराद आस्वाद मी घेतो, म्हणून मी या खेळ खेळतो. पण मागील दोन वर्षांत मला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. पण, जोपर्यंत क्रिकेट खेळण्याचा आनंद मिळतोय, तोपर्यंत खेळत राहिन. जेव्हा वाटेल की थांबायला हवं, तेव्हा नक्की निवृत्ती जाहीर करीन.''
'निवृत्तीविषयी सचिन तेंडुलकरशीही मी चर्चा केली आहे. 37 वर्षांचा असताना त्यालाही निवृत्तीच्या प्रश्नांच्या भडीमाराचा सामना करावा लागला होता आणि त्यामुळेच मी त्याचा सल्ला घेतला. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर माझ्यावरील दडपण कमी झाले,'' असेही युवीने सांगितले.
Web Title: IPL 2019: Nita Ambani has given special honor to Yuvraj Singh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.