Join us  

IPL 2019 : No-Ball वरून कोहलीची सटकली, पंचांच्या रुममध्ये अर्वाच्य भाषा वापरली

IPL 2019 : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये गुरुवारी यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर थरराक विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 3:01 PM

Open in App

बंगळुरू, आयपीएल 2019 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये गुरुवारी यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर थरराक विजय मिळवला. मात्र, लसिथ मलिंगाने टाकलेल्या अखेरच्या चेंडूनं नवाच वाद निर्माण केला. बंगळुरूला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 7 धावांची आवश्यकता होती आणि बंगळुरूला तो सामना 6 धावांनी गमवावा लागला. मात्र, मलिंगाने टाकलेला अखेरचा चेंडू 'No Ball' असल्याचे स्टेडियममधील मोठ्या स्क्रीनवर दिसत होते. पण, पंचांच्या नजरेतून मलिंगाचा नो बॉल निसटला आणि मुंबईच्या खेळाडूंनी मैदानावर जल्लोष केला.

या सामन्यानंतरच्या सोहळ्यापूर्वी मलिंगाचा तो चेंडू 'No Ball' असल्याचे स्क्रीनवर वारंवार दाखवत होते. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनं त्यावर नाराजी व्यक्त केली. काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार कोहली सामन्यानंतर थेट पंचांच्या रुममध्ये पोहोचला आणि त्यानं अर्वाच्य भाषा वापरली. तसेच तो मोठमोठ्यानं ओरडतही होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याचे वृत्त Times Nowने प्रसिद्ध केले आहे. आपल्या या कृत्यानंतर आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोणतीही कारवाई झाल्यास पर्वा नसल्याचेही कोहली म्हणाला. 

या कृत्यानंतर कोहलीवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्याशिवाय बंगळुरूचा संघा फेअर प्ले यादीतील काही गुणही गमावू शकतो. क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एखाद्या खेळाडूनं थेट पंचांच्या रूममध्ये जाऊन दाद मागितल्याची घटना घडली असावी. सामन्यानंतर कोहली म्हणाला,''आपण आयपीएलमध्ये खेळत आहोत, क्लब क्रिकेटमध्ये नाही. शेवटच्या चेंडूवरचा निर्णय हास्यास्पद होता. पंचांनी त्यांचे डोळे उघडे ठेवायला हवे, तो नो बॉल होता. आम्हाला अतिरिक्त चेंडू मिळाला असता आणि कदाचित निकाल काही वेगळा असता. पंचांनी सतर्क राहायला हवे.'' 

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला,''मैदान सोडल्यानंतर तो नो बॉल असल्याचे मला माहित पडले. अशा चुका खेळाला मारक आहेत." मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 187 धावा चोपल्या. प्रत्युत्तरात बंगळुरूनं एबी डिव्हिलियर्सच्या 41 चेंडूंतील 70 धावांच्या जोरावर 5 बाद 181 धावांपर्यंत मजल मारली.

 

टॅग्स :विराट कोहलीआयपीएल 2019रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमुंबई इंडियन्स