आयपीएल २०१९ मध्ये गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्सने दणक्यात सुरुवात केली. सात सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं. यंदाही जेतेपदाचे आपणच प्रबळ दावेदार असल्याची डरकाळीही फोडली. पण, सनरायजर्स हैदराबादनं त्यांचा विजयरथ रोखला आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धचा सामनाही ते जिंकता जिंकता हरले. त्यामुळे त्यांनी अव्वल नंबरही गमावला आहे आणि त्यांची जागा दिल्ली कॅपिटल्सनं घेतली आहे. स्वाभाविकच, धोनीसेना हे स्थान पुन्हा पटकावण्यासाठी आज शर्थीचे प्रयत्न करेल. हैदराबादकडून झालेल्या पराभवाची परतफेड करण्याच्या इराद्यानेच ते मैदानात उतरतील. परंतु, विजयाच्या मार्गावर परतण्यासाठी 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीने चेन्नईच्या संघात एक बदल करणं गरजेचं असल्याचं क्रिकेट जाणकारांचं म्हणणं आहे.
शार्दुल ठाकूरनं चेन्नईसाठी आठ सामन्यांमध्ये सहा विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट ९.२४ आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्यानं ३ षटकांत ३१ धावा दिल्या होत्या आणि त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. त्यानंतर, परवाच्या बेंगलोरविरुद्धच्या सामन्यातही त्यांची चांगलीच धुलाई झाली होती. त्याच्या ४ ओव्हरमध्ये ४० धावा कुटल्या होत्या. हे गणित पाहता, त्याला काही सामन्यांसाठी 'डग आउट'मध्ये बसवावं, असं अनेकांचं मत आहे. त्याच्याऐवजी अनुभवी फिरकीपटू हरभजनसिंग चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर प्रभावी ठरू शकतो, असं तज्ज्ञांना आणि चेन्नईच्या चाहत्यांनाही वाटतंय.
हैदराबादचे दोन्ही सलामीवीर तुफान फॉर्मात आहेत. डेव्हीड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. त्यांना रोखण्यासाठी हरभजन उपयुक्त ठरू शकतो. भज्जी चेन्नईकडून चार सामने खेळलाय. त्यानं सात विकेट्स घेतल्यातच, पण त्याचा इकॉनॉमी रेट ५.१२ आहे. हरभजनचं मानेचं दुखणंही बरं झालंय. त्याला 'डग आउट'मध्ये बसवून न ठेवता मैदानावर उतरवल्यास तो संघाची मान उंचावू शकतो.
धोनी आणि हरभजनसिंग अनेक वर्षं एकत्र खेळलेत. त्यांचं ट्युनिंगही चांगलं आहे. अगदी नवा चेंडूही भज्जी चांगला हाताळू शकतो. त्यामुळे हैदराबादची सलामीची जोडी फोडण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. चेन्नईचे फलंदाज फॉर्मसाठी झगडताना दिसताहेत. महेंद्रसिंग धोनी आणि अंबाती रायुडू वगळता अन्य शिलेदार फारशी छाप पाडू शकलेले नाहीत. त्याबद्दल चेन्नईचा प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगनंही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या धावा रोखण्यावरच त्यांना भर द्यावा लागेल. त्यात हरभजनच्या अनुभवाचा चांगला फायदा होऊ शकतो.
बेंगलोर रॉयल चॅलेंजर्सविरुद्धचा चेन्नईचा पराभव चाहत्यांना रुखरुख लावून गेला. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या पाच चेंडूंवर धोनीनं २४ धावा काढल्या. पण शेवटचा चेंडू हुकला आणि एक धाव घेऊन बरोबरी करण्याच्या प्रयत्नात शार्दुल ठाकूर रन आउट झाला. चेन्नईच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला. त्यामुळे आज घरच्या मैदानावर चेन्नईला जिंकायचंय, आपल्या चाहत्यांना खूश करायचंय.