मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधात भारतात पाकिस्तान सुपर लीगचे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने त्यांच्या देशात इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल 2019) प्रक्षेपण न करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे मंत्री फवाद अहमद चौधरी यांनी ही माहिती दिली, परंतु पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामुळे पाकमधील क्रिकेट चाहत्यांची गोची झाली आहे आणि आयपीएलचे सामने पाहण्यासाठी ते विविध पर्याय शोधत आहेत.
2008नंतर पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. तरीही पाकिस्तानमध्ये आयपीएलचे अधिक चाहते आहेत आणि त्यांना आयपीएलचे सामने पाहायला आवडतात. मात्र, 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील राजकीत संबंध पुन्हा ताणले गेले. त्यामुळेच पाकिस्तान सुपर लीगचे भारतातील प्रसारण थांबवण्यात आले. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान सरकारने आयपीएलचे प्रक्षेपण न दाखवण्याचा निर्णय घेतला आणि तसे आदेश स्थानिक केबल ऑपरेटर्स आणि अन्य कंपन्यांना देण्यात आले आहे.
पाकच्या एका माजी क्रिकेटपटूनं सांगितले की,''पाकिस्तान सुपर लीगचे प्रक्षेपण भारताने थांबवले होते आणि म्हणून पाकिस्तानात आयपीएलचे प्रक्षेपण थांबवण्याचा निर्णय योग्य आहे का, हे मी सांगू शकत नाही. भारत सरकारने तसे करून क्रिकेट आणि राजकारण यांना एकत्र आणले.''
दरम्यान, आयपीएलच्या 12 व्या मोसमाला शनिवारी सुरुवात झाली. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने विजयी सलामी देताना रॉयल्स चॅलेंजर बंगळुरूचा धुव्वा उडवला. हरभजन सिंग, इम्रान ताहीर आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीनं बंगळुरूचा डाव 70 धावांत गुंडाळला आणि चेन्नईने हे माफक लक्ष्य सहज पार केले. नाणेफेकीचा कौल बाजूने लागल्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं संथ खेळपट्टी पाहून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय भज्जी, ताहीर आणि जडेजाने योग्य ठरवला. बंगळुरूच्या पार्थिव पटेलला दुहेरी धावा करता आल्या आणि उर्वरित दहा फलंदाज एकेरी धावेत माघारी परतले. चेन्नईने 17.4 षटकांत 71 धावा करताना विजयी सलामी दिली. अंबाती रायुडूने 42 चेंडूंत 28 धावा केल्या.