नवी दिल्ली, आयपीएल 2019 :: आयपीएलचा ज्वर आता चढायला सुरुवात झाली आहे. आयपीएलच्या बाराव्या हंगामातील विजेता कोण ठरेल, याची उत्सुकता साऱ्यांना आहे. पण दुसरीकडे मात्र आम्ही आयपीएल बघणार नसल्याचे वक्तव्य पाकिस्तानकडून येताना दिसत आहे.
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान क्रिकेट लीगचे प्रक्षेपण न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता पाकिस्तानने आयपीएलवर बहिष्कार घातला आहे.
पाकिस्तानचे प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितले की, "आम्ही क्रिकेट आणि राजकारण या दोन्ही गोष्टी एकत्र आणत नाहीत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाने एका सामन्यात आर्मीचा गणवेश परीधान केला होता. त्यांच्यावर कारवाईदेखील केली नव्हती. पाकिस्तानमध्ये जर आयपीएल दाखवले गेले नाही तर त्यामध्ये भारताचेच नुकसान होणार आहे."
चेन्नई सुपरकिंग्स शहीद जवानांच्या कुटुंबियांना करणार मदत
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. या शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्सचा संघ पुढे आला आहे. आपल्या पहिल्या सामन्यातून मिळणारी सर्व रक्कम चेन्नईचा संघ शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करणार आहे.
चेन्नईच्या संघाचे संचालक राकेश सिंह यांनी यावेळी सांगितले की, " चेन्नई आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु यांच्यामध्ये 23 मार्चला आयपीएलचा पहिला सामना होणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. चेपॉक हे आमचे होम ग्राऊंड आहे. त्यामुळे या सामन्यातून जी रक्कम आम्हाला मिळेल, ती सर्व रक्कम आम्ही शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मानद लेफ्टनेंट कर्नल हे पद देण्यात आले आहेत. त्यामुळे धोनीच ही सारी रक्कम धनादेशाच्या स्वरुपात शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार आहे. "
शहीदांच्या कुटुंबियांना बीसीसीआय 20 कोटींची मदत करणार
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) पुढाकार घेतला आहे. शहीद कुटुंबियांच्या मदतीसाठीच्या आर्मी वेल्फेअर फंडमध्ये 20 कोटी देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 23 तारखेला होणाऱ्या पहिल्या सामन्यात बीसीसीआय भारतीय सैन्य दलाच्या तिनही तुकड्यांच्या प्रमुखांना निमंत्रित करणार आहेत.
Web Title: IPL 2019: Pakistan says, we will not telecast the IPL ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.