मोहाली, आयपीएल 2019 : सलग सहा सामन्यांतील पराभवाची मालिका खंडीत करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शनिवारी आयपीएलच्या 12व्या मोसमात पहिल्या विजयाची चव चाखली. किंग्स इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ख्रिस गेलच्या नाबाद 99 धावांच्या जोरावर 173 धावा केल्या होत्या. विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर बंगळुरूने आठ विकेट्स राखत हा सामना जिंकला. डी' व्हिलियर्सने 38 चेंडूंत नाबाद 59 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पण, या सामन्यानंतर बंगळुरू संघाचा सलामीवीर पार्थिव पटेलने हॉस्पिटलच्या दिशेने धाव घेतली.
बंगळुरूचा यष्टिरक्षक पार्थिव हा गेल्या काही महिन्यांपासून तणावात आहे. त्याला आयपीएलमधील आपल्या संघासाठी योगदान देण्याबरोबरच आजारी वडीलांची काळजी घेण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. पार्थिवच्या वडीलांना ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात अहमदाबाद येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पार्थिवला संघासोबत अनेक शहरांत प्रवास करावा लागत आहे आणि अशा वेळेस त्याचे लक्ष सतत फोनकडे असते. पण, घरातून फोन आल्यावर भीतीच वाटते, असे पार्थिव सांगतो. त्यामुळे मॅच संपल्यावर पार्थिव लगेच वडीलांना पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातो. संघाने त्याला तशी परवानगी दिली आहे.
त्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की,''मैदानावर असताना माझ्या डोक्यात दुसरा कोणताच विचार नसतो. परंतु, मॅच संपताच मला घराची ओढ लागते. सकाळी उठल्यावर वडीलांच्या तब्येतीची चौकशी करतो. डॉक्टरांशी संवाद साधतो. अनेकदा काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात. माझी आई आणि पत्नी घरी असतात, परंतु अखेरचा निर्णय ते मला विचारूनच घेतात. पण, मॅच असताना कुटुंबीयच निर्णय घेतात आणि नंतर मला सांगितले जाते. माझे लक्ष विचलित होऊ नये, याची ते काळजी घेतात."