मुंबई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या सत्राच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारे अंतिम चार संघ येत्या काही दिवसांत आपल्याला कळतील. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने 16 गुणांची कमाई करून प्ले ऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या संघाचा मान मिळवला आहे. मात्र, उर्वरित तीन जागांसाठीची स्पर्धा अजूनही कायम आहे. आयपीएल म्हणटं की येथे रोमांच आलाच, त्यामुळे प्ले ऑफच्या तीन जागांसाठी उर्वरीत सात संघांना समसमान संधी आहे. प्ले ऑफच्या या समिकरणांच गणित जाणून घेऊया...
चेन्नई सुपर किंग्स - CSKने 11 सामन्यांत 16 गुणांची कमाई करताना प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का केला आहे. उर्वरित तीन सामन्यांत हार मानावी लागली तरी महेंद्रसिंग धोनीचा हा संघ अव्वल दोन स्थानात नक्की राहील. आणखी पाच संघांनी 16 गुणांसह साखळी फेरीचा निरोप घेण्याची संधी आहे आणि त्यानंतर नेट रन रेटनुसार क्रमवारी ठरेल.
दिल्ली कॅपिटल्स - 11 सामन्यांत 14 गुणांसह दिल्लीच्या संघाने प्रथमच प्ले ऑफच्या आशा उंचावल्या आहेत. आयपीएलच्या मागील सात सत्रात दिल्लीच्या संघाला एकदाही प्ले ऑफमध्ये प्रवेश करता आलेला नाही. पण, त्यांना तीनपैकी एक सामना जिंकावा लागेल. अन्यथा 14 गुणांवर राहिल्यास त्यांचे प्ले ऑफमधील स्थान धोक्यात येऊ शकते.
मुंबई इंडियन्स - मुंबईनं 10 सामन्यांत 12 गुणांची कमाई केलेली आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने CSKला नमवल्यास गुणतालिकेत ते दुसऱ्या स्थानावर येतील. पण, प्ले ऑफमधील जागा पक्की करण्यासाठी त्यांना चारपैकी दोन सामने जिंकावेच लागतील.
सनरायझर्स हैदराबाद - चारपैकी तीन सामने जिंकल्यास हैदराबादचा संघ प्ले ऑफमधील आपली दावेदारी पक्की करेल. सध्या 10 सामन्यांनंतर त्यांच्या खात्यात 10 गुण आहेत. त्यांचा नेट रन रेट 0.654 असा आहे आणि हिच त्यांच्यासाठी सर्वात सकारात्मक बाब आहे. त्यामुळे 16 गुणांसह ते चौथे स्थान पटकावण्यात नक्की यशस्वी होतील. दोनच विजय मिळवता आले तरीही त्यांच्याकडे अधिक संधी आहे.
किंग्स इलेव्हन पंजाब - मागील पाच सामन्यांत चार पराभव पत्करावे लागल्याने पंजाबच्या वाटचालीला ब्रेक लागला आहे. त्यांना उर्वरित 3 पैकी दोन सामने जिंकावेच लागतील. जर त्यांनी तीनही सामने जिंकले, तर त्यांचा प्ले ऑफ प्रवेश हा निश्चितच होईल. 11 सामन्यांनंतर त्यांच्या खात्यात 10 गुण आहेत.
कोलकाता नाइट रायडर्स - सलग सहा पराभवामुळे कोलकाताचा डोलारा झपाड्याने कोसळला... 11 सामन्यांत त्यांना 8 गुण कमावता आले आहेत. तरीही दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ उर्वरित तीन सामन्यांत विजय मिळवून प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- कोलकाता आणि बंगळुरू या दोघांनी परिस्थिती सारखीच आहे. बंगळुरूने सुरुवातीच्या धक्क्यानंतर स्वतःला सावरत गाडी रुळावर आणली आहे. त्यामुळे त्यांना आता उर्वरित तीन सामन्यांत मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल आणि तरच त्यांना 14 स्थानासह प्ले ऑफमध्ये प्रवेश करता येईल.
राजस्थान रॉयल्स - राजस्थानचे भवितव्य चेन्नई, दिल्ली आणि मुंबई यांच्या सामन्यावर अवलंबून आहे. पण, राजस्थानला तीनही सामने जिंकावे लागतील.