चेन्नई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या हंगामातील सलामीच्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवला. रॉयल्स चॅलेंजर बंगळुरूचा डाव 70 धावांत गुंडाळून चेन्नईने 7 विकेट व 14 चेंडू राखून विजय साजरा केला. हरभजन सिंग आणि इम्रान ताहीर यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, तर रवींद्र जडेजाने 2 विकेट घेत त्यांना चांगली साथ दिली. भज्जीनं RCBचा कर्णधार विराट कोहली, मोईन अली आणि एबी डिव्हिलियर्स या प्रमुख खेळाडूंना तंबूत पाठवले आणि त्यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. पण, या सामन्यात मैदानात उतरण्यापूर्वी प्रचंड तणावात असल्याचे त्याने सांगितले.
नाणेफेकीचा कौल बाजूने लागल्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं संथ खेळपट्टी पाहून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय भज्जी, ताहीर आणि जडेजाने योग्य ठरवला. बंगळुरूच्या पार्थिव पटेलला दुहेरी धावा करता आल्या आणि उर्वरित दहा फलंदाज एकेरी धावेत माघारी परतले. चेन्नईने 17.4 षटकांत 71 धावा करताना विजयी सलामी दिली. अंबाती रायुडूने 42 चेंडूंत 28 धावा केल्या.
कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं सामन्याचे दुसरेच षटक टाकण्यासाठी भज्जीला पाचारण केले. ''पहिल्याच सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे, परंतु मैदानात उतरण्यापूर्वी प्रचंड दडपण जाणवत होते. त्यात माहीनं दुसऱ्याच षटकात चेंडू हातात दिला. पहिले तीन चेंडू मी दडपणातच टाकले, मात्र त्यानंतर आत्मविश्वास आला. सध्या मी जास्त क्रिकेट खेळत नाही. आयपीएल टू आयपीएल असाच प्रवास सुरू आहे आणि त्यामुळे या सामन्यात दडपण होते,''असे भज्जी म्हणाला.
''पंजाबकडूनही मी केवळ तीनच सामने खेळलो होतो. या सामन्यापूर्वी चेपॉकवर येऊन भरपूर सराव केला आणि त्याचा फायदा झाला. तरीही पहिले षटक पूर्ण होईपर्यंत दडपण होतेच. पण, शेर बुढा हुआ है, पर शिकार करना भुला नही. संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा निर्धार होता आणि तो पूर्ण केला याचा आनंद आहे,'' असे भज्जीनं सांगितले. हरभजनने या सामन्यात 4 षटकांत 20 धावा देत 3 विकेट घेतल्या.
पाहा संपूर्ण व्हिडीओ...
https://www.iplt20.com/video/152913/experience-is-the-key-in-big-games-raina