आयपीएल 2019 : आयपीएलच्या या सत्रात सनरायजर्स हैदराबादने एका वेगळ्या कामगिरीची नोंद केली आहे. १४ सामन्यात ६ विजयांसह फक्त १२ गुण मिळवून देखील सनरायजर्स हैदराबाद प्ले ऑफसाठी पात्र ठरला आहे. आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात अव्वल चार संघांमध्ये राहणाऱ्या संघांपैकी एकाही संघाने एवढे कमी गुण मिळवले नव्हते.
या आधी मुंबई आणि राजस्थानने १४ गुण मिळवून देखील प्ले आॅफ गाठला होता. मुंबईने २०१४ आणि २०१६ मध्ये तर राजस्थान रॉयल्सने २०१८ आणि २०१५ मध्ये फक्त १४ गुण मिळवत आपल्या नेट रनरेटच्या धारावर प्ले आॅफ गाठला होता. आता सनरायजर्स हैदराबादने फक्त १२ गुण मिळवूनही ही कामगिरी केली आहे.
विजयासह मुंबई अव्वल, आता आव्हान चेन्नईचे
कोलाकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवत मुंबईने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे आता मुंबईचा पहिल्या क्वालिफायरमध्ये सामना होणार आहे तो चेन्नई सुपर किंग्सबरोबर. मुंबईने या सामन्यात कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय मिळवत अव्वल स्थान पटकावले.
कोलकाता पराभूत झाल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ बाद फेरीत पोहोचला आहे. हैदराबादला आता दिल्ली कॅपिटल्सचा सामना एलिमिनेटरमध्ये करावा लागणार आहे.
कोलकाताच्या 134 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक यांनी 46 धावांची सलामी दिली. डीकॉक यावेळी 30 धावा केल्या. डीकॉक बाद झाल्यावर रोहित आणि सूर्यकुमार यादव (नाबाद 46) यांनी अभेद्य भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रोहितने यावेळी 48 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 55 धावा केल्या.
मुंबईने नाणेफेक जिंकून कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. कोलकाताचा सलामीवीर ख्रिस लिनने झोकात सुरुवात केली. पण हार्दिक पंड्याने मात्र ख्रिस लिन आणि शुभमन गिल या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. हे दोन धक्के बसल्यावर कोलकाताचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. आंद्रे रसेलला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार दिनेश कार्तिकलाही फक्त तीन धावांवर समाधान मानावे लागले.