आयपीएल 2019 : गेल्या काही तासांमध्येच 'मांकड रनआऊट' हा शब्द चांगलाच वायरल झाला आहे. सोमवारी झालेल्या किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना 'मांकड' नियमामुळे चांगलाच गाजत आहे. पंजाबचा कर्णधार आर अश्विन याने राजस्थानच्या जोस बटलरला मांकड नियमानुसार धावबाद केले होते. या गोष्टीचा कल्पक वापर कोलकाताच्या ट्रॅफिक पोलीसांनी केला आहे. याबाबतचे एक ट्विट त्यांनी पोस्ट केले आहे.
लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी कोलकाता ट्रॅफिक पोलीसांनी ही गोष्ट केली आहे. सिग्नल दरम्यान झेब्रा क्रॉसिंग पार केलीत, तर तुमच्यावरही कारवाई होऊ शकते, असे त्यांना सुचवायचे होते.
राजस्थान रॉयल्सला सोमवारी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून हातचा सामना गमवावा लागला. 185 धावांचा पाठलाग करताना राजस्थानने फक्त एका फलंदाजांच्या मोबदल्यात शतक पूर्ण केले होते. पण त्यानंतर त्यांचे 70 धावांमध्ये त्यांनी तब्बल आठ फलंदाज गमावले. पण या सामन्याचा जो बटरलची विकेट टर्निंग पॉईंट ठरली.
कर्णधार अजिंक्य रहाणे आणि जोस बटलर यांनी अर्धशतकी सलामी दिली होती. रहाणे बाद झाल्यावरही बटलरने पंजाबच्या गोलंदाजांच्या समाचार घेतला. बटलर धडाकेबाज फलंदाजी करत होता. पण त्याला पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने ज्याप्रकारे आऊट केले, तो या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. अश्विनने चेंडू टाकण्यापूर्वीच बटलरने क्रीझ सोडले होते. हे अश्विनच्या लक्षात आले आणि त्याने चेंडू न टाकता बटलरला रनआऊट केले. यावेळी बटलर आणि अश्विन यांच्यामध्ये वाद झाला. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हे प्रकरण सुपूर्द केले. तिसऱ्या पंचांनी यावेळी बटलर बाद झाल्याचा निर्णय दिला आणि त्यानंतर सामना पंजाबच्या बाजूने फिरला.
राजस्थानने बाराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शतक पूर्ण केले होते. पण त्यानंतर राजस्थानचा डोलारा कोसळला. मोठे फटके मारण्याच्या नादात राजस्थानच्या फलंदाजांनी आपल्या विकेट्स पंजाबला आंदण दिल्या आणि पराभव ओढवून घेतला.