नवी दिल्ली, आयपीएल 2019 : 2012 नंतर आयपीएलच्या प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख गोलंदाज कागिसो रबाडाने आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे रबाडाला विश्रांतीचा सल्ला दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने दिला आहे. त्यामुळे त्याला आयपीएलमधील उर्वरीत लढती खेळता येणार नाहीत.
रबाडा काही दिवसांपूर्वी पाठीत दुखत होते. त्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार आणि चाचणी करण्यात आली. या चाचणीचे अहवाल दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाला पाठवला. त्यांनी रबाडाबाला विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत रबाडा हा दक्षिण आफ्रिका संघाचा प्रमुख शिलेदार आहे. त्याच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा आफ्रिकेसाठी धोकादायक ठरू शकतो.
सध्याच्या घडीला रबाडाकडे आयपीएलमधील पर्पल कॅप आहे. रबाडाने 12 सामन्यांमध्ये 25 विकेट्स घेतले आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिव विकेट्स मिळवण्याचा मान रबाडाला मिळाला आहे. रबाडानंतर दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सचा इम्रान ताहिर आहे. ताहिरने आतापर्यंत 13 सामन्यांमध्ये 21 विकेट्स मिळवल्या आहेत. साखळी गटाच्या अखेरच्या सामन्यात दिल्लीला शनिवारी राजस्थान रॉयल्सचा सामना करावा लागणार आहे.