नवी दिल्ली, आयपीएल 2019 : कर्णधार श्रेयस अय्यरचे (58*) व सलामीवीर शिखर धवन (56) यांच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने घरच्या मैदानावर 5 विकेट्सने बाजी मारत किंग्स इलेव्हन पंजाबचे कडवे आव्हान परतावले. प्रथम फलंदाजी करत पंजाबने 20 षटकात 7 बाद 163 धावा केल्यानंतर दिल्लीकरांनी 19.4 षटकात 5 बाद 166 धावा केल्या. पंजाबला पराभवाचा धक्का बसलाच असताना कर्णधार आर अश्विनला 12 लाखांचा दंड भरावा लागला. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात षटकांचा वेग संथ राखल्याने अश्विनला हा दंड भरावा लागणार आहे. याआधी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांना स्लो ओव्हर रेटमुळे दंड भरावा लागला आहे.
फिरोझशाह कोटला स्टेडियमवर विजय मिळवताना दिल्लीने आपल्या गुणांची संख्या १२ करताना तिसरे स्थान कायम राखले असून पंजाब 10 गुणांसह चौथ्या स्थानी आहेत. पृथ्वी शॉ (13) पुन्हा अपयशी ठरल्यानंतर धवन-अय्यर यांनी दुसऱ्या गड्यासाठी 92 धावांची भागीदारी करुन दिल्लीला विजयी मार्गावर ठेवले. धवनने 41 चेंडूत 7 चौकार व एका षटकारासह 56 धावा, तर अय्यरने 46 चेंडूत 5 चौकारांसह एक षटकार ठोकून नाबाद 58 धावा काढताना संघाच्या विजयावर शिक्का मारला. 14व्या षटकात धवनला हार्दुस विल्जोन याने बाद केल्यानंतर दिल्लीला ठराविक अंतराने धक्के बसले. मात्र अय्यरने अखेरपर्यंत टिकून राहत संघाचा विजय साकारला.
तत्पूर्वी, ख्रिस गेलच्या आक्रमक अर्धशतकानंतही पंजाबला मर्यादित धावसंख्येवर समाधान मानावे लागले. गेलने 37 चेंडूतच 6 चौकार व ५ षटकारांसह 69 धावा केल्या. तो बाद होताच, पंजाबच्या वेगवान वाटचालीस ब्रेक लागला. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. कर्णधार अय्यरचा हा निर्णय फिरकी गोलंदाज संदीप लॅमिचने लोकेश राहुलला (12) यष्टीचीत करुन सार्थ ठरविला.
पंजाबकडून गेलने दुसºया टोकाकडून आक्रमक फटकेबाजी केल्याने पंजाबच्या धावगतीवर फारसा परिणाम झाला नाही. तरी त्याला अपेक्षित साथ न मिळाल्याने पंजाबला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मनदीप सिंग (27 चेंडूत 30 धावा ) आणि हरप्रीत ब्रर (12 चेंडूत नाबाद 20) यांच्यामुळे पंजाबला दीडशेचा पल्ला पार करता आला. कागिसो रबाडाने 23 धावांत 2 बळी घेत पर्पल कॅपवरील आपली पकड अधिक घट्ट केली. तसेच लॅमिचने याने 40 धावांत 3 बळी घेत पंजाबला हादरे दिले. अक्षर पटेलनेही 22 धावांत 2 बळी घेतले.