जयपूर, आयपीएल 2019 : राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातला सामना गाजला तो आर अश्विन-जोस बटलर यांच्यातील मांकड रनआऊट प्रकरणाने... पंजाबचा कर्णधार अश्विनने जयपूर येथे झालेल्या सामन्यात राजस्थानच्या बटलरला मांकड रनआऊट केले आणि त्यानंतर सामन्याला कलाटणी मिळाली. पंजाबने 14 धावांनी हा सामना जिंकला, परंतु त्या कृतीमुळे अश्विनच्या खिलाडूवृत्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. अश्विनवर माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी जोरदार टीका केली, परंतु गुरुवारी भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड अश्विनच्या मदतीला धावला. क्रिकेटमधील खरा जंटलमन द्रविडनं अश्विनची पाठराखण केली. पण, त्याचवेळी अश्विनने राजस्थानच्या फलंदाजाला एक ताकीद द्यायला हवी होती, असेही द्रविड म्हणाला.
द्रविडने Times of India शी बोलताना अश्विन-बटलरच्या मुद्यावर मत व्यक्त केले. द्रविड म्हणाला,''क्रिकेटच्या नियमानुसारच अश्विनने धावबाद केले आणि त्याला तसे करण्याचा हक्क आहे. पण, त्याने सुरुवातीला बटलरला एक ताकीद द्यायला हवी होती, हे माझं वैयक्तिक मत आहे.''
राजीव शुक्ला म्हणाले, 'अश्विन चुकला'; आयपीएल कारवाई करणार का?आयपीएलचे चेअरमन राजीन शुक्ला यांनीदेखील अश्विन चुकीचा वागला असे मान्य केले आहे. त्यामुळे आता अश्विनवर आयपीएलचे गर्व्हनिंग कौन्सिल काय कारवाई करते, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. आयपीएलपूर्वी कर्णधार आणि पंचांची एक बैठक झाली होती. या बैठकीमध्ये 'मांकड' नियमानुसार कोणत्याही फलंदाजाला आऊट करता येणार नाही, असे सांगण्यात आले होते. ही गोष्ट आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी सांगितली.