कोलकाता, आयपीएल २०१९ : अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात अखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारली. कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या झुंजार खेळीच्या जोरावर कोलकाताने १७५ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग राजस्थानने तीन विकेट्स राखून केला. रियान पराग आणि जेफ्रो आर्चर यांनी साकारलेल्या उपयुक्त खेळींच्या जोरावर राजस्थानने हा विजय साकारला. परागने ३१ चेंडूंत ४७ धावा केल्या, तर आर्चरने १२ चेंडूंत नाबाद २७ धावांची खेळी साकारली.
राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम कोलकात्याला फलंदाजीसाठी पाचारण केले. कोलकात्याच्या फलंदाजांना यावेळी जास्त काळ फलंदाजी करता आली नाही, या गोष्टीला अपवाद ठरला तो कार्तिक. कारण कार्तिकने संघाला फक्त अडचणीतून बाहेर काढले नाही, तर संघाला आव्हानात्मक धावसंख्याही उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.
राजस्थानकडून संघात पुनरागमन करणाऱ्या वरुण आरोनने यावेळी भेदक मारा केला. आरोनने आपल्या चार षटकांमध्ये २० धावा देत दोन फलंदाजांना बाद केले.