जयपूर : १७ वर्षीय युवा फलंदाज रियान पराग दास आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांनी चौथ्या गड्यासाठी केलेल्या निर्णायक ७० धावांच्या भागीदारीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने बलाढ्य मुंबई इंडियन्सला ५ गड्यांनी नमविले. या दमदार विजयासह राजस्थानने आपली गुणसंख्या ६ केली असून ते सातव्या स्थानी असून मुंबईकरांनी पराभवानंतरही आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे गेल्या सत्रापासून आतापर्यंत या संघादरम्यान झालेल्या सर्व चार सामन्यांत राजस्थानने बाजी मारत मुंबईवरील आपले वर्चस्व सिद्ध केले.
सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकून मुंबईकरांना प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. राजस्थानच्या गोलंदाजांनी नियंत्रित मारा करताना मुंबईला २० षटकात ५ बाद १६१ धावांवर रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने १९.१ षटकात ५ बाद १६२ धावा केल्या. आक्रमक सुरुवात केलेल्या राजस्थानला फिरकीपटू राहुल चहरने पाठोपाठ ३ धक्के दिल्याने त्यांची आठव्या षटकात ३ बाद ७७ धावा अशी अवस्था झाली होती. मात्र यानंतर युवा रियानने स्मिथला जबरदस्त साथ देताना संघाला विजयी मार्गावर ठेवण्यात मोलाचे योगदान दिले. स्टीव्ह स्मिथने ४८ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह नाबाद ५९ धावा करुन संघाच्या विजयात निर्णायक खेळी केली. त्याला उपयुक्त साथ देणाऱ्या रियानने २९ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ४३ धावांची दमदार खेळी केली. चहरने २९ धावांत ३ बळी घेतले. तत्पूर्वी, सलामीवीर क्विंटन डॉकॉक याने ४७ चेंडूत ६ चौकार व २ षटकारांसह ६५ धावांची खेळी केल्यानंतरही मुंबईला मर्यादित धावसंख्येवर समाधान मानावे लागले. कर्णधार रोहित शर्मा (५) अपयशी ठरल्यानंतर सूर्यकुमार यादवने ३३ चेंडूत ३४ धावांची संथ खेळी करत डीकॉकसह ९७ धावांची भागीदारी केली खरी, मात्र सूर्यकुमारच्या संथ फलंदाजीमुळे मुंबईला वेग पकडता आला नाही.
डीकॉकने चांगली फटकेबाजी करताना मुंबईच्या धावगतीला वेग देण्याचा प्रयत्न केला. स्टुअर्ट बिन्नीने सूर्यकुमारला बाद केल्यानंतर लगेच डीकॉकही श्रेयस गोपालच्या गोलंदाजीवर परतला. यामुळे मुंबईचा डाव घसरला. हार्दिक पांड्याने १५ चेंडूत २३ धावा केल्याने मुंबईला दीडशेचा पल्ला पार करता आला. धडाकेबाज किएरॉन पोलार्डही (१०) फारशी छाप पाडून शकला नाही. गोपालने २ बळी घेत मुंबईला रोखण्यात मोलाचे योगदान दिले.
आयपीएल पदार्पण केल्यानंतर पहिल्या दोन सामन्यांत शून्यावर बाद होणारा राजस्थानचा एश्टन टर्नर स्पर्धा इतिहासातील केवळ दुसरा फलंदाज ठरला. याआधी 2009 साली रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून पदार्पण केलेल्या न्यूझीलंडच्या जेसी रायडरला पहिल्या दोन सामन्यांत भोपळा फोडण्यात यश आले नव्हते.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने अजिंक्य रहाणेकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घेत, आॅस्टेÑलियाच्या स्टीव्हन स्मिथकडे संघाची धुरा सोपविली. राजस्थानने आपल्या अधिकृत टिष्ट्वटर हँडलवरून ही घोषणा केली.
संक्षिप्त धावफलक :
मुंबई इंडियन्स : २० षटकात ५ बाद १६१ धावा
(क्विंटन डीकॉक ६५, सूर्यकुमार यादव ३४; श्रेयस गोपाल २/२१.) पराभूत वि. राजस्थान रॉयल्स : १९.१ षटकात ५ बाद १६२ धावा (स्टीव्ह स्मिथ नाबाद ५९, रियान पराग ४३; राहुल चहर ३/२९.)
Web Title: IPL 2019: Rajasthan Royals defeated Mumbai by 4 runs in the row
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.