मुंबई, आयपीएल 2019 : जम्मू काश्मीरच्या रसिख सलाम दारने रविवारी मुंबई इंडियन्सकडून इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) पदार्पण केले. 17 वर्ष आणि 353 दिवसांचा रसिख हा मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणारा युवा खेळाडू ठरला. पहिल्याच सामन्यात रसिखला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने चार षटकात 42 धावा दिल्या. पण, त्याचा जम्मू काश्मीर ते मुंबई इंडियन्स हा प्रवास थक्क करणारा आहे.
भारतीय संघाचा माजी गोलंदाज झहीर खानने रविवारच्या सामन्यात रसिखला मुंबई इंडियन्सची कॅप दिली. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्यातील अशमुजी या गावातील त्याचा जन्म. मुंबई इंडियन्सने त्याला २० लाखांत आपल्या चमूत दाखल करून घेतले.दहशतवादी हल्ल्याने प्रभावित असलेल्या कुलगाममधील गावातील रसिदवर 2018 च्या 19 वर्षांखालील कूच बिहार स्पर्धेदरम्यान मुंबई इंडियन्सच्या सदस्याची नजर पडली. त्यानंतर रसिदला नवी मुंबईत झालेल्या मुंबई इंडियन्सच्या निवड चाचणीसाठी बोलावण्यात आले.
जयपूर येथे पार पडलेल्या लिलावात रसिखला मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. पण, ही बातमी त्याच्यापर्यंत पोहोचायला बराच वेळ लागला. कारण, मुंबईने त्याला आपलेसे केले त्यावेळी रसिखच्या घरात वीज नव्हती. त्यामुळे रात्री उशीरा त्याला ही माहिती मिळाली आणि रसिखच्या स्वप्नांना आशेचे पंख मिळाले.
रसिखचे वडिल शिक्षक आहेत. परवेझ रसूल याच्यानंतर आयपीएलमध्ये खेळणारा रसिख हा जम्मू काश्मीरचा दुसरा खेळाडू आहे. रसूलने आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. जम्मू-काश्मीरच्या मंजूर दारला गत मोसमात किंग्स इलेव्हन पंजाबने आपल्या ताफ्यात घेतले, परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.