मुंबई : गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्याने इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 12 व्या हंगामाची सुरुवात होणार आहे. गतवर्षी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आयपीएलमध्ये पुनरागमन करताना जेतेपदाला गवसणी घातली होती. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमनवर चेन्नईने 2018 मध्ये अंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघाला नमवून तिसरे जेतेपद पटकावले होते.
यंदाही चेन्नईच जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात कॅप्टन कूल धोनी आणि विराट कोहली यांच्यातील चुरस पाहायला मिळणार आहे. दक्षिणेकडील दोन्ही संघांत बाजी कोण मारेल, याची उत्सुकता आतापासूनच लागलेली आहे. लोकसभा निवडणुक लक्षात घेता आयपीएलच्या पहिल्या दोन आठवड्यांचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मंगळवारी 17 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आणि त्यात मुंबई इंडियन्सच्या वाट्याला चार सामने आले आहेत. आठही संघांना घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणार आहे.
23 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीतील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 5 एप्रिलला बंगळुरू कोलकाता नाईट रायडर्सचा सामना करणार आहे. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर केलेले ट्विट सध्या चांगलेच गाजत आहे. त्यांनी लिहिले की,''दक्षिण भारत डर्बीचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज. पण, आम्हाला स्वीट सांबार आवडतो.''