आयपीएल 2019 : पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना 62 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची 3.2 षटकांत 1 बाद 41 अशी स्थिती असताना पाऊस आला आणि सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बंगळुरुच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने चांगली सुरुवात केली. संजू सॅमसमनने उमेश यादवच्या पहिल्या षटकात 10 धावा काढल्या. दुसऱ्या षटकात राजस्थानने बिनबाद 22 अशी मजल मारली होती. तिसऱ्या षटकात राजस्थानेन 40 धावांपर्यंत मजल मारली.
राजस्थानने नाणेफेक जिंकून बंगळुरुला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना पाच षटकांचा खेळवण्यात आला. या पाच षटकांच्या सामन्यांची तुफानी सुरुवात विराट कोहली आणि एबी डि'व्हिलियर्स यांनी केली. वरुण आरोनच्या पहिल्याच षटकात या दोघांनी तब्बल 23 धावा कुटून काढल्या. पण दुसऱ्या षटकात श्रेयस गोपाळने हॅट्रिक घेतली आणि बंगळुरुची धावगती रोखण्याचे काम बजावले. त्यानंतर अन्य फलंदाजांच्या जोरावर बंगळुरुने पाच षटकांमध्ये सात विकेट्स गमावत 62 धावा जमवल्या.