बंगळुरू, आयपीएल 2019 : डेल स्टेन आणि उमेश यादव यांनी सुरुवातीलाच दिलेल्या धक्क्यातून चेन्नई सुपर किंग्सला महेंद्रसिंग धोनीने सावरले. धोनीने आतषबाजी करताना थरारक सामन्यात चेन्नईला विजया नजीक आणले, परंतु अवघ्या एका धावेने त्यांचा विजय हुकला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने हा सामना १ धावेने जिंकून प्ले ऑफच्या आशा अजून जीवंत राखल्या आहेत. चेन्नईला प्ले ऑफमधील प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. महेंद्रसिंग धोनीने अखेरपर्यंत संघर्ष केला,परंतु चेन्नईला विजय मिळवून देण्यासाठी तो पुरेसा ठरला नाही. धोनीने 84 धावांची खेळी केली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 7 बाद 161 धावा केल्या. पार्थिव पटेलच्या अर्धशतकी खेळीनं बंगळुरूला समाधानकारक पल्ला गाठून देण्यात हातभार लावला. कर्णधार विराट कोहली स्वस्तात माघारी परतल्यानंतर पटेलने बंगळुरूसाठी खिंड लढवली. त्याने 37 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकार खेचून 53 धावा केल्या. त्याला एबी डिव्हिलियर्स ( 25), अक्षदीप नाथ ( 24) आणि मोइन अली ( 26) यांची साथ मिळाली. चेन्नईकडून दीपक चहर, रवींद्र जडेजा आणि ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
रायुडू आणि धोनी या जोडीने अर्धशतकी भागीदारी करून चेन्नईचा संघर्ष कायम राखला. पण चहलने रायुडूला त्रिफळाचीत केले. रायुडूने 29 धावा केल्या. रवींद्र जडेजाही फार काही करू शकला नाही. धोनी एका बाजूने संघर्ष करत होता. त्याने 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पण त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. चेन्नईला 8 बाद 160 धावा करता आल्या.