बंगळुरू, आयपीएल 2019 : विराट कोहली स्वस्तात बाद झाल्यानंतर पार्थिव पटेल आणि एबी डिव्हिलियर्स यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या डावाला आकार दिला. दोघांनी दमदार खेळी करताना संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करून दिली. मात्र, रवींद्र जडेजाने ABDला बाद केले. जडेजाच्या चेंडूवर ABDने उत्तुंग फटका मारला, परंतु सीमारेषेनजीक फॅफ ड्यू प्लेसिसने सुरेख झेल टिपून त्याला माघारी पाठवले.चेन्नईने नाणेफेक जिंकून यजमान बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सावध सुरुवातीनंतर विराट कोहली आणि पार्थिव पटेल ही जोडी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चक्रव्युहात अडकली. सामन्याच्या तिसऱ्याच षटकात दीपक चहरने चेन्नईला पहिले यश मिळवून देताना कोहलीला यष्टिरक्षक धोनीकरवी झेलबाद केले. कोहली 9 धावांवर माघारी परतला. एबी डिव्हिलियर्सने या सामन्यातून पुनरागमन केले. आयपीएलमधील त्याचा हा 150 वा सामना ठरला आणि हा पल्ला गाठणारा तो पहिलाच परदेशी खेळाडू आहे. त्याने बंगळुरूचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डिव्हिलियर्सने टोलावलेला चेंडू फॅफ ड्यु प्लेसिसने टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश आले नाही. त्याच्या या प्रयत्नावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. डिव्हिलियर्ससोबत सलामीवीर पटेलही अधूनमधून चेन्नईच्या गोलंदाजांवर हात साफ करत होता. बंगळुरूने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 49 धावा केल्या. सातव्या षटकात धोनीनं रवींद्र जडेजाला पाचारण केले. पटेलने खणखणीत षटकाराने जडेजाचे स्वागत केले. मात्र, पाचव्या षटकात जडेजाने बंगळुरूला मोठा धक्का दिला. त्याच्या गोलंदाजीवर डिव्हिलियर्सने उत्तुंग फटका मारला, परंतु फॅफ ड्यु प्लेसिसने अगदी सीमारेषेनजीक सुरेख झेल टिपला. 19 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार खेचून डिव्हिलियर्स माघारी परतला.
पाहा व्हिडीओ..
https://www.iplt20.com/video/176522