बंगळुरू, आयपीएल 2019 : क्षेत्ररक्षणात कमाल दाखवणाऱ्या फॅफ ड्यू प्लेसिसचे नशीब जोरात होते. उमेश यादवच्या गोलंदाजीवर चेंडू यष्टींना चाटून गेला, परंतु बेल्स न पडल्याने प्लेसिस बाद होण्यापासून वाचला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 7 बाद 161 धावा केल्या. पार्थिव पटेलच्या अर्धशतकी खेळीनं बंगळुरूला समाधानकारक पल्ला गाठून देण्यात हातभार लावला. कर्णधार विराट कोहली स्वस्तात माघारी परतल्यानंतर पटेलने बंगळुरूसाठी खिंड लढवली. त्याने 37 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकार खेचून 53 धावा केल्या. त्याला एबी डिव्हिलियर्स ( 25), अक्षदीप नाथ ( 24) आणि मोइन अली ( 26) यांची साथ मिळाली. चेन्नईकडून दीपक चहर, रवींद्र जडेजा आणि ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला पहिल्याच षटकात धक्का बसला. डेल स्टेनने पाचव्या चेंडूवर चेन्नईच्या शेन वॉटसनला बाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर अप्रतिम यॉर्कर टाकून सुरेश रैनाचा त्याने त्रिफळा उडवला. चौथ्या षटकात फॅफला नशिबाची साथ मिळाली. उमेश यादवने टाकलेला चेंडू यष्टींना चाटून गेला, परंतु बेल्स न पडल्याने फॅफला माघारी जावे लागले नाही.
पाहा व्हिडीओ..
https://www.iplt20.com/video/176872