बंगळुरू, आयपीएल 2019 : श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ या मुंबईकर खेळाडूंनी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे बारा वाजवले. या जोडीने दमदार फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सला 4 विकेट राखून विजय मिळवून दिला. बंगळुरूचा हा सलग सहावा पराभव ठरल्याने प्ले ऑफ मध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा मार्ग अधिक खडतर झाला आहे. 149 धावांचा पाठलाग करताना पृथ्वीने 28, तर अय्यरने 67 धावांची खेळी केली. दिल्लीने हे लक्ष्य 18.5 षटकांत पूर्ण केले.
रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या मात्तबर फलंदाजांना पुन्हा एकदा अपयश आल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात कर्णधार विराट कोहली वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. कोहलीनेही 41 धावा करण्यासाठी 33 चेंडूंचा सामना केला. बंगळुरूने निर्धारीत 20 षटकांत 8 बाद 149 धावा केल्या आहेत. कागिसो रबाडाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. त्याने एकाच षटकात बंगळुरूच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले.
य्यरने कॉलीन इंग्रामसह दिल्लीची लक्ष्याच्या दिशेने वाटचाल सुरूच ठेवली. या दोघांनी बंगळुरूच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. 14व्या षटकात दिल्लीला आणखी एक धक्का बसला. इंग्राम 22 धावांवर मोइन अलीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. अय्यरने 37 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमधली त्याचे 11 वे अर्धशतक ठरले. अय्यरने 50 चेंडूंत 67 धावा केल्या. त्यात 8 चौकार व 2 षटकारांचा समावेश आहे.