बंगळुरू, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या मात्तबर फलंदाजांना पुन्हा एकदा अपयश आल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात कर्णधार विराट कोहली वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. कोहलीनेही 41 धावा करण्यासाठी 33 चेंडूंचा सामना केला. बंगळुरूने निर्धारीत 20 षटकांत 8 बाद 149 धावा केल्या आहेत. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये कासवगतीने खेळूनही कोहलीनं दिल्लीविरुद्ध एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
ख्रिस मॉरिसच्या पहिल्याच चेंडूवर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला जीवदान मिळाले. मॉरिसने टाकलेला चेंडू तिसऱ्या स्लीपमधून मारण्याचा कोहलीनं प्रयत्न केला, परंतु तेथे उभ्या असलेल्या शिखर धवनच्या हातातून झेल सुटला. त्यानंतर कोहली संयमानेच खेळत होता. पहिल्या 17 चेंडूंत तर त्याने एकही चौकार मारला नव्हता. दुसऱ्या बाजूने अन्य सहकारी मोठे फटके मारण्याच्या नादात तंबूत परतत होता. तरीही कोहलीची बॅट थंडच होती. कोहली एका बाजूनं संयमी खेळी करून विकेट टिकवून होता. त्यामुळे त्याच्याकडून अखेरच्या षटकांत चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित होती आणि त्याने 17 व्या षटकात त्याचा ट्रेलर दाखवला. संदीपच्या त्या षटकात कोहलीनं 19 धावा चोपल्या.
पण, पुढच्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर तो कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरच्या हातात झेल देऊन माघारी परतला. कोहलीने 33 चेंडूंत 41 धावा केल्या. त्यात 1 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. या खेळीसह कोहलीनं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 802 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध 800 धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. चेन्नई सुपर किंग्सच्या सुरेश रैनाने मुंबई इंडियन्सविरुद्ध हा पल्ला पार केला आहे.