बंगळुरू, आयपीएल 2019 : कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि पार्थिव पटेल यांच्या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 205 धावा कुटल्या. पण कोलकाता नाइट रायडर्सने कोहलीला तणावात ठेवले होते. पवन नेगीने बंगळुरुच्या कर्णधाराचे टेंशन कमी केले, परंतु अन्य गोलंदाजांकडून त्याला योग्य साथ मिळाली नाही. आंद्रे रसेलने पुन्हा एकदा फिनिशरची भूमिका पार पाडली. त्याच्या फतकेबाजीच्या जोरावर कोलकाताने 5 विकेट राखून सामना जिंकला. रसेलने 13 चेंडूंत 7 षटकार आणि 1 चौकार खेचून 48* धावा केल्या.
बंगळुरूने शुक्रवारी सलग चार सामन्यांत झालेल्या पराभवाचा राग कोलकातावर काढला. इंडियन प्रीमिअर लीगच्या या सामन्यात बंगळुरूच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. कोहलीनं विक्रमांचे डोंगर उभे केले. त्याला पार्थिव पटेल व एबी डिव्हिलियर्स यांची उत्तम साथ लाभली. बंगळुरूने निर्धारीत 20 षटकांत 3 बाद 205 धावा केल्या.
17 वी धाव घेताच कोहलीनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 8000 धावांचा पल्ला पार केला. अशी कामगिरी करणारा तो ख्रिस गेल नंतर दुसरा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. त्याने 30 वर्षे व 151 दिवसांत त्याने हा पल्ला गाठला. ट्वेंटी-20त 8000 धावा करणारा कोहली हा सातवा फलंदाज आहे आणि सुरेश रैनानंतर दुसरा भारतीय फलंदाज आहे. नीतीश राणाने कोलकाताला पहिले यश मिळवून दिले. त्याने पटेलला 25 धावांवर पायचीत केले. पटेलने 24 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या होत्या.
कोहली आणि डिव्हिलियर्स या जोडीनंही दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. कोहली आणि डिव्हिलियर्स या जोडीनं बंगळुरूला मोठी धावसंख्या गाठून दिली. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करणाऱ्या खेळाडूंमध्ये या दोघांनी आघाडी मिळवली. कोहली व डिव्हिलियर्स यांच्यात 9 शतकी भागीदारी झाल्या आहेत. कुलदीप यादवने 18 व्या षटकात ही जोडी फोडली. 49 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकार खेचून 84 धावा करणाऱ्या कोहलीला त्यानं बाद केले. डिव्हिलियर्सने 32 चेंडूंत 63 धावा केल्या. त्यात 5 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. त्याला नरीनने बाद केले.
लक्ष्याचा पाठलाग करताना सुनील नरीन आणि ख्रिस लीन यांनी कोलकाताला 28 धावांची सलामी दिली. लिनला एक जीवदानही मिळाल, परंतु नरीन 10 धावांवर माघारी परतला. मात्र, आयपीएलमध्ये त्याने 2000 धावांचा पल्ला पार केला. नरीन माघारी परतल्यानंतर लिन आणि रॉबीन उथप्पा यांनी कोलकाताचा डाव सावरला. दोघांनी दमदार खेळी करतान संघाला 5 षटकांत 51 धावांपर्यंत मजल मारून दिली. पहिल्या पॉवर प्लेमध्ये कोलकाताने 59 धावा चोपल्या.
उथप्पा आणि लीन ही सेट जोडी बंगळुरूच्या पवन नेगीनं तोडली. दहाव्या षटकात त्यानं उथप्पाला झेलबाद करून माघारी पाठवले. उथप्पाने 25 चेंडूंत 6 चौकांरांसह 33 धावा केल्या. कोलकातानं 10 षटकांत 2 बाद 94 धावा झाल्या होत्या. मोहम्मद सिराजने 11व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लीनचा झेल सोडला. लीनला 42 धावांवर असताना मार्कस स्टोइनिसच्या गोलंदाजीवर जीवदान मिळाले. नीतीश राणाच्या षटकाराने कोलकाताने शतकी आकडा पार केला.
नेगीनं पुन्हा एकदा कोलकाताला धक्का दिला. सलामीवीर लीनचा अडथळा दूर करताना त्यानं कर्णधार विराट कोहलीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. लीनने 31 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 43 धावा केल्या. राणा आणि दिनेश कार्तिक खिंड लढवत होते. राणाने उत्तम फटकेबाजी करताना धावांचा वेग वाढवला, परंतु युजवेंद्र चहलने त्याला बाद केले. 37 धावांवर तो माघारी परतला. कोलकाताला अखेरच्या चार षटकांत 66 धावा हव्या होत्या आणि त्यांची भिस्त आंद्रे रसेलवर होती. 17 व्या षटकात कार्तिक बाद झाला आणि कोलकाताला 18 चेंडूत 53 धावा हव्या होत्या. नवदीप सैनीने कार्तिकला बाद केले.
पण रसेलने कोलकाताला आणखी एका विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली. 18 व्या षटकात कोलकाताने 23 धावा चोपल्या.रसेलने 19 व्या षटकातच कोलकाताचा विजय जवळपास निश्चित केला होता. टीम साउदीच्या त्या षटकात त्याने 29 धावा कुटल्या.
Web Title: IPL 2019 RCB vs KKR: Virat fails in fifth attempt; André Russell threw the grass
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.