बंगळुरू, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनं इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शुक्रवारी विक्रमाला गवसणी घातली. कोलकाता नाइट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात त्यानं 17 वी धाव घेताच कोहलीनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 8000 धावांचा पल्ला पार केला. अशी कामगिरी करणारा तो ख्रिस गेल नंतर दुसरा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. त्याने 30 वर्षे व 151 दिवसांत त्याने हा पल्ला गाठला. ट्वेंटी-20त 8000 धावा करणारा कोहली हा सातवा फलंदाज आहे आणि सुरेश रैनानंतर दुसरा भारतीय फलंदाज आहे.
पार्थिव पटेलने दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारताना आपला फॉर्म कायम असल्याचे दाखवून दिले. विराट कोहलीनेही अखेरच्या दोन चेंडूवर खणखणीत चौकार खेचले. बंगळुरूने पहिल्याच षटकात 13 धावा जोडल्या. त्यानंतर कोहलीनं फटकेबाजी केली. बंगळुरूने 5 षटकांत 50 धावा केल्या.
- बंगळुरू आणि कोलकाता यांच्या आतापर्यंत 22 सामने झाले आहेत आणि त्यापैकी 13 सामने कोलकाताने जिंकले आहेत. 2017 मध्ये उभय संघांत झालेल्या चार सामन्यांत कोलकाताने बाजी मारली आहे.
- आयपीएलच्या 12व्या मोसमात एकही विजय न मिळवणारा बंगळुरू हा एकमेव संघ आहे. बंगळुरूला चेन्नई आणि सनरायझर्स हैदराबाद संघांकडून दारूण पराभव पत्करावा लागला, तर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सकडून त्यांनी हातचा सामना गमावला.
- सलग चार सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यामुळे बंगळुरूचा प्ले ऑफ प्रवेशाचा मार्ग खडतर बनला आहे. त्यांना उर्वरित 10पैकी 7 सामन्यांत आता विजय मिळवावा लागणार आहे.
- कोलकाताच्या विजयात आंद्रे रसेलची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. त्यांना दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला आहे आणि तोही सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता.