बंगळुरू, आयपीएल 2019 : सलग पाच सामन्यांची पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची सुरुवात फार चांगली झाली नाही. पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्यांना दोन विकेट गमवावे लागले आणि त्यात एबी डिव्हिलियर्सचा समावेश होता. या सामन्यात डिव्हिलियर्सला एक विक्रम करण्याची संधी होती, पण त्याला आता 13 एप्रिलच्या सामन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्स संघाने यजमान बंगळुरूला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. ख्रिस मॉरिसच्या पहिल्याच चेंडूवर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला जीवदान मिळाले. मॉरिसने टाकलेला चेंडू तिसऱ्या स्लीपमधून मारण्याचा कोहलीनं प्रयत्न केला, परंतु तेथे उभ्या असलेल्या शिखर धवनच्या हातातून झेल सुटला. पण, षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पार्थिव पटेलला बाद करून मॉरिसने दिल्लीला पहिले यश मिळवून दिले.
मॉरिसने 9 चेंडूंत 9 धावा केल्या. पटेल माघारी परतल्यानंतर कोहली व एबी डिव्हिलियर्स यांनी बंगळुरूच्या डावाला आकार दिला. या दोघांना मोठे फटके मारण्यापासून दिल्लीच्या गोलंदाजांनी रोखले आणि त्यामुळेच बंगळुरूला पॉवर प्लेमध्ये 2 बाद 40 धावा करता आल्या. सहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कागिसो रबाडाने डिव्हिलियर्सला माघारी पाठवले. डिव्हिलियर्सने 16 चेंडूंत 1 चौकार व 1 षटकारासह 17 धावा केल्या. कॉलीन इंग्रामने त्याचा अप्रतिम झेल घेतला.