चेन्नई, आयपीएल २०१९ : रॉयल चँलेजर्स बंगलोर संघात किती तडाखेबंद फलंदाज असले तरी देखील सर्वाधिक वेळा निचांकी कामगिरी देखील याच संघाने केली आहे. आयपीएलच्या या सत्रात पहिल्याच सामन्यात आरसीबीचे दहा फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. अशी कामगिरी आरसीबीने या आधी चार सामन्यात केली आहे.
चेन्नई सुपर किंग्ज विरोधात आरसीबीने ७० धावा केल्या. पार्थिव पटेल वगळता एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही. अशी कामगिरी रॉयल चँलेंजर्स बंगलोरने या आधी २००८ मध्ये केकेआर विरोधात केली होती. त्याशिवाय २०१७ च्या सत्रात पुण्यात झालेल्यासामन्यात रायजींग पुणे सुपरजायंट्स संघाविरोधातही आरसीबीचे १० फलंदाज एकेरी धावसंख्येतच बाद झाले होते. तर२०१७ मध्येच कोलकाता नाईट रायडर्स विरोधात खेळताना आरसीबीचे सर्वच फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले होते. या सामन्यात आरसीबीचा संघ फक्त ४९ धावाच करू शकला होता.
हरभजन सिंग आणि इम्रान ताहिर यांच्या भेदक गोलंदाजीमुळे चेन्नई सुपर किंग्सने पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचा ७० धावांत खुर्दा उडाला. बंगळुरुकडून पार्थिव पटेलचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर तग धरता आला नाही.
चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या हरभजन सिंगने पहिल्याच सामन्यात आपली जादू दाखवत इतिहास रचला आहे. हरभजनने या सामन्यात चार षटकांमध्ये २० धावा देत तीन बळी मिळवले. ताहिरनेही हरभजननंतर अचूक मारा केला. ताहिरने फक्त ९ धावांमध्ये बंगळुरुच्या तीन फलंदाजांना बाद केले.
आयपीएलमध्ये आतापर्यंत स्वत:च्याच गोलंदाजीवर सर्वाधिक झेल पकडणाऱ्या गोलंदाजांच्या यादीमध्ये हरभजनने अव्वल क्रमांक पटकावला आहे. पहिल्या सामन्यात हरभजनने मोईल अलीचा स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल पकडला. हरभजनने स्वत:च्याच गोलंदाजीवर हा अकरावा झेल पकडत इतिहास रचला आहे. हा पराक्रम करताना हरभजनने चेन्नईच्याच ड्वेन ब्राव्होला पिछाडीवर टाकले आहे. ब्राव्होने असा पराक्रम दहा वेळा केला होता.