मुंबई, आयपीएल 2019 : भारताचा सर्वात यशस्वी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीचा वारसदार म्हणून रिषभ पंतकडे पाहिले जात आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत राखीव यष्टिरक्षक म्हणून पंतच्याच नावाची चर्चा आहे. त्यात पंतने इंडियन प्रीमिअर लीगच्या पहिल्याच सामन्यात वानखेडेवर वादळी खेळी केली. पंतच्या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 213 धावा चोपल्या आणि मुंबई इंडियन्सवर 37 धावांनी विजय मिळवला. पंतने 27 चेंडूंत 78 धावांची धमाकेदार खेळी केली. पंतने या खेळीत 7 चौकार व 7 षटकारांची आतषबाजी केली. पंतच्या या खेळीचे सोशल मीडियावरही भरभरून कौतुक झाले. जागतिक क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी 20 वर्षीय पंतची आतंरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द उज्ज्वल असल्याचे मत व्यक्त केले. मुंबई इंडियन्सच्या युवराज सिंगनेही पंतचे कौतुक केले. मुंबईकडून पदार्पण करणाऱ्या युवीनेही पहिल्याच सामन्यात 53 धावांची खेळी केली. तो म्हणाला,''वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय संघात रिषभ पंतची निवड होईल की नाही, याबाबत मी भाष्य करू शकत नाही, परंतु त्याची आजची खेळी अविश्वसनीय होती. मागाली सत्रातही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. कसोटी संघातही त्यानं आपली छाप पाडली आहे आणि त्याने दोन शतकंही झळकावली आहेत. त्यावरूनच तो लंबी रेस का घोडा आहे, याची कल्पना येते. त्याला योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास तो भारतीय संघाचा भविष्याचा स्टार असेल.''दक्षिण आफ्रिकेच्या कॉलीन इंग्रामनेही पंतचे कौतुक केले. ''मागील वर्षापासून त्याला मी खेळताना पाहत आहे आणि त्याच्या फटकेबाजीत सातत्य आहे. त्याचे चांगल्या फॉर्मात असणे संघाचा फायद्याचे आहे. तो आमच्यासाठी मॅच विनर आहे आणि त्याची प्रचिती आज पुन्हा आली,'' असे इंग्राम म्हणाला. दरम्यान, मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या 12व्या मोसमातील पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. दिल्लीच्या 213 धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संपूर्ण संघ 176 धावांवर माघारी परतला. मुंबईकडून युवराज वगळता एकाही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
पाहा संपूर्ण व्हिडीओ..
https://www.iplt20.com/video/154096/will-play-cricket-till-the-time-i-enjoy-it-yuvraj-singh?tagNames=indian-premier-league