कोलकाता, आयपीएल 2019 : ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंत याच्यावर लागलेला बेबी सीटिंगचा टॅग सुटता सुटेना. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने दौऱ्यात पंतला बेबी सीटिंगसाठी विचारत स्लेजींग केली होती. त्यावेळी पंतनेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यातही पंत बेबी सीटिंग करताना पाहायला मिळाला. दिल्ली कॅपिटल्सचा हा खेळाडू शिखर धवनचा मुलगा झोरावर याच्यासोबत खेळताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बेबी सीटर म्हणून व्हायरल होत आहे.
गब्बरकडून विक्रमांचे 'शिखर' सर; कोहली, वीरूला टाकले मागे
शिखर धवन आणि रिषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला. कोलकाता नाइट रायडर्सला परतीच्या लढतीतही दिल्लीला नमवता आले नाही. विजयासाठीचे 179 धावांचे लक्ष्य दिल्लीने 7 विकेट राखून पार केले. धवनने 63 चेंडूत 11 चौकार व 2 षटकार खेचत नाबाद 97 धावा केल्या. आयपीएलमधील पहिल्या शतकापासून त्याला वंचित रहावे लागले. सामना संपल्यानंतर पंत झोरावरसोबत खेळताना दिसला. लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी दिल्लीला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी दहाच्या सरासरीने धावा केल्या. पण तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर प्रसिध कृष्णाने दिल्लीला पहिला धक्का दिला. त्याने पृथ्वी शॉला ( 14) बाद केले. आंद्रे रसेलच्या पहिल्याच षटकात धवनला जीवदान मिळाले. चौथ्या षटकाचा दुसरा चेंडू धवनच्या बॅटीला चाटून दुसऱ्या स्लीपच्या दिशेने गेला, परंतु नितीश राणाला तो टीपता आला नाही आणि चेंडू सीमापार गेला. सहाव्या षटकात दिल्लीला दुसरा धक्का बसला. आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यर बाद झाला. दिल्लीने पॉवर प्लेमध्ये 2 बाद 57 धावा केल्या. धनन एका बाजूनं दिल्लीची खिंड लढवत होता. त्याने 32 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या 53 धावांत 2 षटकार व 6 चौकारांचा समावेश होता. त्याच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने 10 षटकांत 2 बाद 88 धावा केल्या.त्यानंतर धवन व रिषभ पंत या जोडीने दिल्लीला विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली. दोघांच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर दिल्लीने 15 षटकांत 2 बाद 138 धावा केलेल्या. पंतला 46 धावांवर नितीश राणाने माघारी पाठवले, परंतु तोपर्यंत कोलकाताच्या हातून सामना निसटला होता. धवनच्या नाबाद 97 धावांनी दिल्लीचा विजय पक्का केला.