मुंबई, आयपीएल 2019 : किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर जोरदार सराव केला होता आणि या सरावात रोहितला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पंजाबविरुद्धच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. रोहितच्या अनुपस्थितीत किरॉन पोलार्डने 31 चेंडूंत 10 षटकार आणि 3 चौकारांच्या जोरावर 83 धावांची तुफानी खेळी साकारली. पोलार्डच्या या खेळीमुळेच मुंबईला पंजाबवर तीन विकेट्स राखून विजय मिळवता आला. या विजयासह मुंबईने विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली.
सराव सत्रात रोहित लंगडत चालताना दिसत होता आणि त्याने सराव सत्रातूनही विश्रांती घेतली. धावण्याचा सराव करतान रोहितचा पाय मुरगळला आणि वेदनेने कळवळत त्याने मैदानावरच लोटांगण घातले. मुंबई इंडियन्सचे फिजिओ नितीन पटेल यांनी त्वरीत मैदानावर धाव घेत रोहितवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर रोहित ड्रेसिंग रुममध्ये परतला. त्यामुळे पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. पण, शनिवारी मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सचा सामना करावा लागणार आहे. या सामन्यात रोहित खेळणार की नाही याबाबत उत्सुकता आहे.