मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 12व्या हंगामाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू यांच्यात उद्घाटनीय सामना होणार आहे. पण, या सामन्यापेक्षा सर्वांना उत्सुकता लागली आहे ती युवराज सिंगच्या फटकेबाजीची. युवी यंदा प्रथमच मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे आणि संघाने सोमवारीच युवीचे जोरदार स्वागत केले. पण, मुंबई इंडियन्सच्या अंतिम अकरा खेळाडूंत युवीला संधी मिळेल की नाही, याबाबत गुढ कायम आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानं मंगळवारी याबाबत मोठ विधान केलं आणि गरज पडल्यास युवीसाठी फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करण्याची तयारीही त्यानं दर्शवली.
युवीच्या येण्याने संघ आणखीन मजबूत झाल्याची प्रतिक्रिया झहीर खाननं दिली. झहीर म्हणाला,''लिलावात बरेच खेळाडूंवर बोली लागली नाही. माझ्यावरही पहिल्या टप्प्यात बोली लागलेली नव्हती. लिलावात प्रत्येक संघ एक रणनिती ठरवून बोली लावतो. त्यामुळेच युवराजला अखेरच्या फेरीत का घेतले, पहिल्याच फेरीत का नाही, यावर उत्तर देऊ शकत नाही. पण, युवराज ताफ्यात दाखल झाल्यामुळे संघात चैतन्य संचारले आहे.''
2018च्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करताना युवीला आठ सामने खेळवण्यात आले. त्यात त्याला 10.83च्या सरासरीनं केवळ 65 धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सने लिलावात अगदी अखेरच्या टप्प्यात युवीला 1 लाखाच्या मुळ किंमतीत आपल्या चमूत दाखल करून घेतले. युवराजच्या समावेशामुळे मुंबई इंडियन्सचा संघ संतुलित झाला आहे. रोहितनेही तेच मत व्यक्त केले.
तो म्हणाला,''युवीच्या येण्याने मधल्या फळीत आम्हाला सक्षम पर्याय मिळाला आहे. त्यामुळे मला सलामीला खेळता येणार आहे. युवी हा मॅच विनर आहे. याआधी मी मुंबई इंडियन्ससाठी काही सामन्यांत सलामीला आलो आहे, परंतु युवीच्या येण्यानं मधल्या फळीचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमात मुंबईकडून सलामीला मीच येणार.''
युवीच्या खेळण्याबाबत सस्पेन्स युवीमुळे अनुभवी खेळाडू संघात आला असल्याचे रोहित आणि झहीरने सांगितले असले तरी त्याच्या खेळण्याबाबद संदिग्धता कायम आहे. रोहित म्हणाला,''मधल्या फळीसाठी युवी आणि सिद्धेश लाड ही दोन नावं विचाराधीन आहे. अनुभवाच्या बाबतीत सिद्धेश मागे पडत असला तरी स्थानिक स्पर्धांमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. मागील अनेक वर्ष तो मुंबई इंडियन्सचा भाग आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार अंतिम अकरामध्ये कोणाला संधी द्यायची याचा निर्णय घेतला जाईल.''