बंगळुरु, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये आज आयपीएलच्या बाराव्या हंगामातला पहिला सामना रंगणार आहे. पण आतापर्यंत झालेल्या या दोन्ही संघांच्या सामन्यांमध्ये नेमकं भारी कोण पडलंय, हे तुम्हाला माहिती आहे का...
आतापर्यंत मुंबई आणि बंगळुरु यांच्यामध्ये एकूण 23 सामने झाले आहेत. या 23 सामन्यांपैकी मुंबईने 14 सामने जिंकले आहेत, तर बंगळुरुने नऊ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. बंगळुरुमध्ये या दोन्ही संघांमध्ये 9 सामने झाले आहेत. या नऊ सामन्यांपैकी तब्बल सामने मुंबईने जिंकले आहेत, तर दोन सामन्यांमध्ये बंगळुरुला विजय मिळवता आला आहे.
या हंगामात दोन्ही संघांना आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्याच लढतीत चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने बंगळुरुचे पानीपत केले होते. या सामन्यात बंगळुरुच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. चेन्नईने बंगळुरुवर पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता.
मुंबईलादेखील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. हा पराभव एवढा दारुण होता की, त्यांना गुणतालिकेत अखेरचे स्थान मिळाले आहे. दिल्लीच्या संघाने मुंबईविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 213 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना युवराज सिंगने दमदार अर्धशतक झळकावले होते. पण युवराजला मुंबईला विजय मिळवून देता आला नव्हता. त्यामुळे बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा संघ पहिला विजय मिळवणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.
आरसीबी-मुंबई विजयी मार्ग पकडण्यास उत्सुकएकदिवसीय क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ फलंदाज विराट कोहली आणि सर्वश्रेष्ठ गोलंदाज जसप्रीत बुमराह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व मुंबई इंडियन्स यांच्यादरम्यान गुरुवारी खेळल्या जाणाऱ्या सामन्यात समोरासमोर असतील, त्यावेळी सर्वांची नजर या दोन खेळाडूंदरम्यान रंगणाऱ्या लढतीवर असेल.दोन्ही संघ यंदाचा आपला पहिला विजय नोंदवण्यासाठी उत्सुक आहे. अशावेळी कोहली व रोहित यांच्यावर फलंदाजीची मोठी जबाबदारी राहील. बुमराह दुखापतग्रस्त झाल्याने चिंतेचा वातावरण होते, पण त्यातून सावरत तो आपली छाप सोडण्यास सज्ज झाला आहे. त्याच्या उपस्थितीत मुंबई बंगळुरूच्या कमकुवत बाजूचा लाभ घेण्यासाठी प्रयत्नशील असेल. बुमराहची खांद्याची दुखापत मुंबईसाठी चिंतेचा विषय ठरली होती, पण तो योग्यवेळी फिट झाला आहे. श्रीलंकेचा लसिथ मलिंगा उपलब्ध असल्याने मुंबईची गोलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. युवराज सिंगच्या कामगिरीवर सर्वांची नजर राहील. त्याने दिल्लीविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. मुंबईचा वेगवान गोलंदाज मिशेल मॅक्लेनगनची कोहली, एबी डिव्हिलियर्स व शिमरोन हेटमेयर यांच्याविरुद्ध कडवी परीक्षा राहील.