जयपूर, आयपीएल 2019: अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीनंतरही राजस्थान रॉयल्स संघाला विजयपथावर राहण्यात अपयश आले. शिखर धवनने रचलेल्या मजबूत पायावर पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत यांनी विजयाचा कळस चढवला. दिल्ली कॅपिटल्स संघाने 6 विकेट राखून विजय मिळवला. या पराभवामुळे राजस्थानच्या प्ले ऑफच्या आशाही संपुष्टात आल्या. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून राजस्थानने आशा कायम राखल्या होत्या, परंतु त्यांना आज दिल्लीविरुद्ध अपयश आले. दिल्लीने या विजयाबरोबर गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. आयपीएलच्या इतिहासात दिल्लीने प्रथमच ही भरारी घेतली.
कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्यामुळे खांद्यावरील भार हलका झालेल्या अजिंक्य रहाणेने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. रहाणेने यंदाच्या मोसमातील पहिले आणि आयपीएलमधले दुसरे शतक झळकावताना राजस्थान रॉयल्सला 6 बाद 191 धावांचा पल्ला गाठून दिला. कर्णधार स्टीव्हन स्मिथने अर्धशतकी खेळी करताना त्याला चांगली साथ दिली. सात वर्षांनंतर रहाणेने आयपीएलमध्ये शतक झळकावले. त्याने 2012मध्ये पहिले शतक झळकावले होते. रहाणेने 63 चेंडूंत 11 चौकार व 3 षटकारांसह 105 धावांवर नाबाद राहिला. प्रत्युत्तरात दिल्लीनं सावध सुरुवात केली. राजस्थानचा कर्णधार स्मिथने पहिल्या पाच षटकांत पाच खेळाडूंकडून गोलंदाजी करून घेतली. मात्र, शिखर धवनने दमदार फटकेबाजी केली. दुसरीकडे पृथ्वी शॉ संयमी खेळ करत होता. धवनने संघाच्या धावांचा वेग दहाच्या सरासरीने सुरू ठेवला. सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पृथ्वीने उडवलेला चेंडू टिपण्यात अॅश्टन टर्नरला अपयश आले. 10 धावांवर असताना पृथ्वीला जीवदान मिळाले. धवन आणि पृथ्वी यांनी अर्धशतकी भागीदारी केली आणि यंदाच्या मोसमातील सलामीवीरांनी नोंदवलेली ही पहिलीच अर्धशतकी भागीदारी ठरली. पॉवर प्लेमध्ये दिल्लीनं एकही फलंदाज न गमावता 59 धावा केल्या. धवनने 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पण, 54 धावांवर तो बाद झाला. श्रेयस गोपाळच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने धवनला यष्टिचीत केले. धवनने 27 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकारांसह 54 धावा केल्या. दिल्लीकडून सर्वात दुसरे जलद अर्धशतक ठरले. या विक्रमात रिषभ पंत ( 18 चेंडू) आघाडीवर आहे. श्रेयस अय्यरही (4) रियान परागच्या गोलंदाजीवर बाद झाला. आयपीएलमध्ये विकेट घेणारा तो दुसरा युवा गोलंदाज ठरला. दिल्लीच्या 10 षटकांत 2 बाद 81 धावा झाल्या होत्या.श्रेयस अय्यरही (4) रियान परागच्या गोलंदाजीवर बाद झाला. आयपीएलमध्ये विकेट घेणारा तो दुसरा युवा गोलंदाज ठरला. दिल्लीच्या 10 षटकांत 2 बाद 81 धावा झाल्या होत्या.मुजीब उर रहमानने 17 वर्ष व 11 दिवसांचा असताना आयपीएलमध्ये पहिली विकेट घेतली होती. पराग 17 वर्ष व 163 दिवसांचा आहे. या विक्रमात पी सांगवान ( 17 वर्ष व 181 दिवस) आणि वॉशिंग्टन सुंदर ( 17 वर्ष व 201 दिवस) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. दिल्लीने 11.3 षटकातं शतकी पल्ला गाठला. पृथ्वी व पंत या जोडीने अर्धशतकी भागीदारी करताना दिल्लीला विजयाच्या समीप आणले. पृथ्वी 39 चेंडूंत 42 धावा करून माघारी परतला. पंतने खिंड लढवत दिल्लीचा विजय पक्का केला. पंतने 36 चेंडूंत 6 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 78 धावा केल्या.