जयपूर, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दमदार खेळ केला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करताना अंबाती रायुडू व महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला. आयपीएलमध्ये स्टीव्हन स्मिथच्या कर्णधारपदाची विजयाची टक्केवारी ही 66.67 अशी आहे. त्याने 24 सामन्यांतील 16 सामने जिंकले आहेत. पूणे वॉरियर्स इंडिया (1), राजस्थान रॉयल्स ( 8) आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स ( 15) आदी संघांचे नेतृत्व सांभाळले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्धच्या आजच्या सामन्यात सर्वांची उत्सुकता लागली होती. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. मुंबईला तिसऱ्याच षटकात झटका बसला. राजस्थानच्या श्रेयस गोपाळने तिसऱ्याच षटकात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला ( 5) बाद केले. त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर क्विंटन डी कॉकला जीवदान मिळाले. जोफ्रा आर्चरचा झेल घेण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. मात्र, पुढच्याच षटकात डी कॉकने सर्व दडपण झुगारून धवल कुलकर्णीच्या गोलंदाजाची धुलाई केली. डी कॉकने कुलकर्णीच्या त्या षटकात सलग तीन चौकार व एक षटकारासह 19 धावा चोपल्या. मुंबईने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 46 धावा केल्या. डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. डी कॉकने 34 चेंडूंत अर्धशतक झळकावले. मुंबईने 10 षटकांत 1 बाद 81 धावा केल्या. 14व्या षटकात डी कॉक व यादव ही जोडी तुटली. स्टुअर्ट बिन्नीने यादवला ( 34) कुलकर्णीकरवी झेलबाद केले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. पुढच्या षटकात डी कॉकही माघारी परतला. श्रेयस गोपाळने सामन्यातील दुसरी विकेट घेतली. डी कॉकने 47 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकार खेचून 65 धावा केल्या. डी कॉक आणि यादव यांनी जयपूरच्या या मैदानावर विक्रमी कामगिरी केली. त्यांनी अंबाती रायुडू व महेंद्रसिंग धोनी यांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या 95 धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला.