नवी दिल्ली, आयपीएल 2019 : कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल पुन्हा एकदा तळपला. रसेलच्या धडाकेबाद अर्धशतकामुळे कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सपुढे धावांचे 186 आव्हान ठेवले. रसेलने 28 चेंडूंत चार चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 62 धावांची तुफानी खेळी साकारली.
दिल्लीने नाणेफेक जिंकत कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. दिल्लीचा हा निर्णय योग्य असल्याचे पहिल्या दहा षटकांमध्ये पाहायला मिळाले. कारण दिल्लीने कोलकात्याचा अर्धा संघ फक्त 61 धावांमध्ये गुंडाळला. पण त्यानंतर दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल यांनी कोलकात्याचा डाव सावरला. दिनेश कार्तिकनेही यावेळी 36 चेंडूंत 50 धावांची खेळी साकारली.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून निखिल नाईक हा सलामीला आला आणि साऱ्यांनीच डोळे विस्फारले. कारण यापूर्वी हे नाव फारसं कुणाला माहिती नव्हतं. त्यामुळे तो थेट सलामीलाच आल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात निखील सलामीला येईल, हे कुणाच्या गावीही नव्हते. त्यामुळे त्याला पाहिले आणि साऱ्यांनाच त्याच्याबद्दल प्रश्न पडला. त्यानंतर त्याच्या नावाचा सर्च सुरु झाला. आतापर्यंत निखिलने 38 स्थानिक ट्वेन्टी-20 सामने खेळले आहेत. या 38 सामन्यांमध्ये निखिलने 34 वेळा फलंदाजी केली आहे. निखिलने आतापर्यंत नाबाद 95 धावांची धडाकेबाज खेळी साकारली आहे. निखिलची सरासरी 30.32 असून त्याचा स्ट्राइक रेट 130.16 एवढा आहे. यष्टीरक्षण करतानाही निखिलने चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नावावर 19 झेल आणि 4 स्टम्पिंग्स आहेत.