नवी दिल्ली, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सचा आजचा सामना होणार आहे तो दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये. सचिन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्स संघाचा सल्लागार आहे. पण आतापर्यंत सचिन कधीही खेळपट्टी पाहण्यासाठी आला नव्हता. पण फिरोझशाह कोटला मैदानातील खेळपट्टी पाहण्यासाठी सचिन आवर्जुन आला. त्यामुळे या दिल्लीच्या पीचमध्ये नेमकं दडलंय तरी काय, असा सवा चाहते उपस्थित करत होते.
अखेरच्या षटकांमध्ये पंड्या बंधूंनी केलेल्या दमदार फलंदाजीमुळे मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. मुंबईला प्रथम फलंदाजी करताना 168 धावा करता आल्या आणि दिल्लीला 169 धावांचे आव्हान देता आले.
मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. रोहितने 22 चेंडूंमध्ये 30 धावा केल्या, तर डीकॉकने 27 चेंडूंत 35 धावा केल्या. या दोघांनी सात षटकांमध्ये 57 धावांची सलामी दिली. पण हे दोघे बाद झाल्यावर मुंबईची धावगती थोडीशी कमी झाली. पण त्यानंतर कृणाल आणि हार्दिक या पंड्या बंधूंनी सावरले. हार्दिकने 15 चेंडूंत 32 धावा, तर कृणालने 26 चेंडूंत नाबाद 37 धावा केल्या.