जयपूर, आयपीएल 2019 : सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही भारतीय वन डे संघातील सर्वात यशस्वी सलामीची जोडी... या जोडीनं तगड्या प्रतिस्पर्धी संघांना चांगलाच इंगा दाखवला. मैदानावरील बॉंडिंग प्रमाणे मैदानाबाहेरही हे दोघे चांगले मित्र आहेत. त्यामुळे एकमेकांचे कौतुक करण्यात आणि प्रसंगी कानही पकडण्यासही ते मागेपुढे बघत नाहीत. याची प्रचिती सोमवारी आली. दिल्ली कॅपिटल्स संघाने सोमवारी राजस्थान रॉयल्स विरुद्धचा सामना 6 विकेट राखून जिंकला. दिल्लीच्या सल्लागारपदी गांगुली आहे आणि दिल्लीच्या या विजयाचे तेंडुलकरने भरभरून कौतुक केले.
अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीनंतरही राजस्थान रॉयल्स संघाला विजयपथावर राहण्यात अपयश आले. शिखर धवनने रचलेल्या मजबूत पायावर पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत यांनी विजयाचा कळस चढवला. दिल्ली कॅपिटल्स संघाने 6 विकेट राखून विजय मिळवला. या पराभवामुळे राजस्थानच्या प्ले ऑफच्या आशाही संपुष्टात आल्या. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून राजस्थानने आशा कायम राखल्या होत्या, परंतु त्यांना आज दिल्लीविरुद्ध अपयश आले. दिल्लीने या विजयाबरोबर गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. आयपीएलच्या इतिहासात दिल्लीने प्रथमच ही भरारी घेतली.
192 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना धवनने 27 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकारांसह 54 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर पंत व पृथ्वी या युवा खेळाडूंनी दिल्लीचा विजय पक्का केला. पृथ्वी 39 चेंडूंत 42 धावा करून माघारी परतला. पंतने खिंड लढवत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पंतने 36 चेंडूंत 6 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 78 धावा केल्या.
तेंडुलकर म्हणाला," रिषभची खेळी सामन्याला कलाटणी देणारी होती. त्याने धावांचा वेग कायम राखत दिल्लीचा धावफलक हलता ठेवला. शिखर धवनने रचलेल्या मजबूत पायाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. पृथ्वी शॉने संयमी खेळ करत विजयात हातभार लावला."
Web Title: IPL 2019 sachin Tendulkar praises delhi capitals and rishabh pants performance
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.