मुंबई, आयपीएल 2019 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावले. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन तगडे संघ अंतिम फेरीत समोरासमोर आले होते आणि त्यांच्या निमित्ताने रोहित व कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी या यशस्वी कर्णधारांमध्ये चुरस रंगली. यात बाजी हिटमॅन रोहितने मारली. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चौथ्यांदा आयपीएल जेतेपद नावावर केले आणि लीगमधील तो सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्यामुळे रोहितवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानेही रोहितच्या नेतृत्वकौशल्याचे कौतुक केले, परंतु त्याचवेळी त्याने धोनीच्या नेतृत्वगुणाचीही स्तुती केली.
रोहित आणि धोनी यांच्यातील नेतृत्वगुणाशी तुलना करताना एकाला झाकावे आणि दुसऱ्याला काढावे, असे मत तेंडुलकरने व्यक्त केले.धोनीचे रणनीती ज्ञान सर्वांना माहीत आहे आणि रोहितनेही मागील अनेक वर्षांत ते आत्मसात केले आहे. त्याने आयपीएलचे चार जेतेपद पटकावली आहेत आणि भारतीय संघात उपकर्णधार म्हणून त्याची कामगिरी उजवी ठरली आहे. तेंडुलकर म्हणाला,''रोहित आणि धोनी हे दोघेही चतुर आहेत. गेली अनेक वर्ष धोनी नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत आहे आणि रोहितनेही कर्णधार म्हणून अविश्वसनीय यश प्राप्त केले आहे. सामन्याचा कल ओळखणे आणि परिस्थितीनुसार नियोजन करण्याची क्षमता त्यांना खास ठरवते. सामन्याची परिस्थिती ओळखण्याचे धोनीचे कसब आपण अनेकदा अनुभवले आहे आणि आता रोहितही त्यावर खरा उतरतो आहे.''
गौतम गंभीरनं केलं पुन्हा कॅप्टन कोहलीला टार्गेट; म्हणाला संघात तुझ्यापेक्षा आहे सक्षम कर्णधारभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे कान टोचण्याची एकही संधी भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर दवडत नाही. इंडियन प्रीमिअर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या लाजीरवाण्या कामगिरीनंतर गंभीरने कोहलीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. सोमवारी पुन्हा एकदा त्याने कॅप्टन कोहलीवर निशाणा साधला. कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. पण,कर्णधार म्हणून त्याला रोहिल शर्माने तगडे आव्हान उभे केले आहे, असे मत व्यक्त करून त्याने कोहलीचे टेंशन वाढवले आहे.
तो म्हणाला," रोहितच्या नावावर चार आयपीएल जेतेपद आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नावावर तीन, परंतु कोहलीच्या नावावर एकही नाही. रोहितने कर्णधार म्हणून स्वत:ला सिध्द केले आहे. त्यामुळे त्याच्याकडे केवळ कोहलीच्या अनुपस्थितीतील पर्याय म्हणून पाहू नका. रोहितने आता सर्वोच्च शिखर गाठले आहे आणि भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी तो तगडा पर्याय ठरू शकतो. फलंदाज म्हणून विराट ग्रेट आहे, पण कर्णधार म्हणून रोहित वरचढ ठरतो."