हैदराबाद, आयपीएल 2019 : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीनं इंडियन प्रीमिअर लीगच्या 12 व्या मोसमातील खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा आहेत. वर्ल्ड कपसाठी भारतीय संघातील चौथ्या क्रमांकाचा पेच अजूनही कायम आहे. प्रत्येकवेळी या क्रमांकासाठी नवीन नाव समोर येत आहे आणि ही यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही यादी इतकी वाढली आहे की त्यातूनच एक स्वतंत्र संघ मैदानात उतरवला जाऊ शकतो. भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्रानं या चौथ्या क्रमांकाच्या यादीची चांगलीच थट्टा उडवली आहे. पण, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनं चौथ्या क्रमांकासाठी संजू सॅमसन हाच योग्य पर्याय असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच सॅमसन हा सध्याच्या घडीचा देशातील सर्वोत्तम यष्टिरक्षक असल्याचेही मत व्यक्त केले.
आयपीएलमध्ये शुक्रवारी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या सामन्यात संजू सॅमसनची बॅट चांगलीच तळपली. मात्र, त्याच्या शतकी खेळीवर हैदराबादने पाणी फिरवलं आणि राजस्थानला हार मानावी लागली. अजिंक्य रहाणे व सॅमसन यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने हैदराबाद संघाविरुद्ध 198 धावा चोपल्या. रहाणे 70 धावांवर माघारी परतला, तर सॅमसनने नाबाद 102 धावा चोपताना चौकार-षटकारांची आतषबाजी केली. सॅमसनने 55 चेंडूंत 10 चौकार व 4 षटकार खेचले. रहाणेने 49 चेंडूंत 70 धावा केल्या आणि त्यात 4 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता.
सॅमसनच्या या खेळीनंतर वर्ल्ड कप संघातील चौथ्या क्रमांकाच्या दावेदाराची चर्चा पुन्हा सुरु झाली. अंबाती रायुडू, विजय शंकर, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, युवराज सिंग, सुरेश रैना, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, संजू सॅमसन, शुबमन गिल, दिनशे कार्तिक, नीतीश राणा, मनीष पांडे, इत्यादी नावांची चर्चा सुरु आहे. त्यावरून आकाश चोप्रानेही खिल्ली उडवली.