मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) नुकतेच इंडियन प्रीमिअर लीग 23 मार्चपासून सुरू होणार असल्याची घोषणा केली. आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसले तरी लीगमुळे झिम्बाब्वेचा भारत दौरा अडचणीत आला आहे. लोकसभा निवडणूकांमुळे यंदा आयपीएल स्पर्धा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. याच कालावधीत झिम्बाब्वे भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे हा दौरा रद्द करावा लागेल किंवा वेळापत्रक बदलावे लागेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
या मालिकेनंतर खेळाडूंना केवळ दहा दिवसाची विश्रांती मिळणार आहे. याच दहा दिवसात झिम्बाब्वेविरुद्ध मालिका खेळावी लागणार आहे. आयपीएल लवकर होणार असल्याने हा पेच निर्माण झाला आहे आणि त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धची मालिका रद्द केली जाऊ शकते. याबाबत झिम्बाब्वे क्रिकेट संघटना बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी पुढील आठवड्यात चर्चा करणार आहेत.
वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडूंना अधिक सराव मिळावा म्हणून या मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. 2002 नंतर प्रथमच झिम्बाब्वे भारतात द्विदेशीय मालिका खेळणार होते. झिम्बाब्वे संघ 2016च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या निमित्ताने शेवटचा भारताता आला होता. त्यापूर्वी 2011 वर्ल्ड कप आणि 2006च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी झिम्बाब्वेच्या संघाने भारत दौरा केला होता.