मुंबई, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली हा आक्रमक आहे, असे म्हटले जाते. त्याचबरोबर सामन्यात कोहली हा बऱ्याचदा निराश झालेला पाहायला मिळतो. काही वेळेला मैदानातच तो आपला राग काढतो. सोमवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात तर कोहलीकडून अशोभनीय कृत्य पाहायला मिळाले. या कृत्याचा समालोचकांनीही चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे पुन्हा एकदा पराभवाचे पाढे या सामन्यात पाहायला मिळाले. गेल्या सामन्यात बंगळुरुचा संघ विजयाच्या मार्गावर परतला होता. पण या सामन्यात मात्र बंगळुरुला मुंबईकडून पराभव पत्करावा लागला. मुंबईने पाच विकेट्स राखून हा सामना जिंकला. हार्दिक पंड्याने १६ चेंडूंत नाबाद ३७ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे.
या सामन्यातील अठराव्या षटकातील पहिल्या चेंडूवर हा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले. त्यासाठी कारणीभूत ठरली ती सतराव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर घडलेली घटना. सतरावे षटक नवदीप सैनी टाकत होता. या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर हार्दिक पंड्याने एक मोठा फटका मारला. हा चेंडू चांगलाच हवेत उडाला होता. या चेंडूचा पाठलाग टीम साऊथी करत होता. साऊथी आता हा झेल टिपणार, असे वाटत होते. पण साऊथीला हा झेल पकडता आला नाही आणि चेंडूने सीमारेषा ओलांडली. हार्दिकला यावेळी चौकार मिळाला. यावेळी कोहली निराश झाल्याचे पाहायला मिळाले. पण त्यानंतरच्या चेंडूवर कोहलीने जे कृत्य केले ते या सभ्य गृहस्थांच्या खेळासाठी शोभनीय नक्कीच नव्हते.
या सामन्यातील अठरावे षटक वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज टाकत होता. सिराजच्या अठराव्या षटकातील पहिला चेंडूचा सामना कृणाल पंड्या करत होता. त्यावेळी कृणालने सिराजचा पहिला चेंडू मिड ऑफला फटकावला. कृणालने चेंडू मारताना ताकद लावली होती, पण त्याला योग्य टायमिंग साधता आला नाही. हा चेंडू कोहलीच्या दिशेने जात होता. जर कोहलीने हा चेंडू पकडून लगेच थ्रो केला असता तर कृणाल रन आऊट झाला असता. हा चेंडू पकडण्यासाठी कोहली धावला. कोहलीच्या हाताला हा चेंडू लागला, पण हातामध्ये आला नाही. कोहलीने दुसऱ्यांदा चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हाही चेंडू हातात आला नाही. त्यावेळी कोहलीला आपला राग अनावर झाला. त्यावेळी कोहलीने चेंडू लाथाडला. हे सामन्याचे समालोचन करणाऱ्या माजी क्रिकेटपटूंनी पाहिले आणि याबाबत नाराजी व्यक्त केली.