मुंबई : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेचं महत्त्व लक्षात घेता इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल 2019) भारतीय संघातील खेळाडूंवर पडणाऱ्या अतिरिक्त तणावावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार रोहित शर्मा या दोघांनीही खेळाडूंनी स्वतःच्या शारीरिक क्षमतेचा विचार करूनच किती सामने खेळावे, याचा निर्णय घ्यावा असे ठाम मत व्यक्त केले. आतापर्यंत आयपीएलमधील एकाही संघाने मात्र भारतीय खेळाडूंवर पडणाऱ्या अतिरिक्त तणावावर भाष्य केलेल नव्हते, परंतु किंग्स इलेव्हन पंजाब संघाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता पंजाबने जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला पुरेशी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
इंग्लंड व वेल्स येथे 30 मे पासून वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मोहम्मद शमीनं भारतीय संघाकडून दमदार कामगिरी केली आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेत जसप्रीत बुमराहसह तो जलदगती गोलंदाजीचा भार सांभाळणार आहे. पंजाब संघाचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी सांगितले की,'' लोकेश राहुल व मोहम्मद शमी यांच्याशी मी चर्चा केली आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी ते आतुर आहेत, परंतु त्यांना आम्ही सामन्यादरम्यान पुरेशी विश्रांती मिळावी याच काळजी घेणार आहोत.''
हेसन पुढे म्हणाले,''आयपीएल दरम्यान त्यांना थकवा जाणवला, तर त्यांना आराम दिला जाईल. त्याशिवाय अतिरिक्त सरावाची गरज भासल्यास तेही आम्ही देण्याची आमची तयारी आहे. त्याचवेळी संघाची कामगिरी कशी होईल, याकडेही आमचे लक्ष असेल.''