चेन्नई, आयपीएल 2019 : ऑस्ट्रेलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्नचे बरेच चाहते आहेत. ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वॉर्नने आपले कसब दाखवले होते. पण मुंबई इंडियन्सचा एक फिरकीपटू तर वॉर्नचा फक्त चाहताच नाही, कारण हा फिरकीपटू वॉर्नला आपला गुरु मानतो. एकलव्यासारखंच मुंबईच्या फिरकीपटूने वॉर्नचे व्हिडीओ पाहून गोलंदाजी करायला सुरुवात केल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे या फिरकीपटूसाठी वॉर्न हाच द्रोणाचार्य असल्याचे म्हटले जात आहे.
एका पत्रकार परिषदेमध्ये हा फिरकीपटू म्हणाला की, " मी वॉर्नचा मोठा चाहता आहे, माझ्यासाठी तो आदर्श आहे. मी 8 वर्षांचा होतो, तेव्हापासून मी वॉर्नच्या गोलंदाजीचे व्हिडीओ पाहत आहे. हे व्हिडीओ पाहूनच मी माझ्या गोलंदाजीमध्ये अमुलाग्र बदल करू शकलो. वॉर्नचे व्हिडीओ पाहूनच मी मोठा झालो आहे."
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू नेमका आहे तरी कोण? तर हा फिरकीपटू आहे 19 वर्षीय राहुल चहार. आतापर्यंत मुंबईकडून खेळताना राहुलने दमदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत आठ सामन्यांमध्ये राहुलने 9 विकेट्स मिळवले आहेत. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीमध्ये चहर हा तिसऱ्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्सबाबत चहर म्हणाला की, " गेल्या वर्षीही मी मुंबई इंडियन्सच्या संघात होतो. पण मला खेळण्याची संधी मिळाली नाही. पण मला शेन बाँड आणि झहीर खान यांच्याकडून भरपूर शिकायला मिळाले आहे. या दोघांनीही माझ्या गोलंदाजीमध्ये सकारात्मक बदल घडवले आहेत. या दोघांच्या मार्गदर्शनाचा फायदा मला यंदाच्या मोसमात खेळताना होत आहे."
दुनिया हिला दी; मुंबईचा चेन्नईवर 46 धावांनी विजयमुंबई इंडियन्सनंचेन्नई सुपर किंग्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर 46 धावांनी पराभव केला. महेंद्रसिंग धोनीशिवाय खेळणाऱ्या चेन्नईच्या संघाची फलंदाजी आज पूर्णपणे ढेपाळली. कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईनं प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 155 धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. ठराविक अंतरानं चेन्नईचे फलंदाज बाद होत गेले. लसिथ मलिंगानं 4, कृणाल पांड्या आणि जसप्रित बुमराहनं प्रत्येकी 2, तर हार्दिक पांड्या आणि अनुकूल रॉयनं प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडलं. गोलंदाजांच्या शानदार कामगिरीमुळे चेन्नईचा डाव अवघ्या 109 धावांना गडगडला.