नवी दिल्ली, आयपीएल 2019 : चॅम्पियन... चॅम्पियन, या गाण्यानं DJ क्षेत्रात दमदार एन्ट्री करणाऱ्या ड्वेन ब्राव्होचं नवं गाणं नुकतंच चाहत्यांच्या भेटीला आलं. DJ Bravo या नावानं प्रसिद्ध झालेल्या वेस्ट इंडिजच्या या अष्टपैलू खेळाडूने नव्या गाण्यात आशिया खंडातील क्रिकेट संघांचे कौतुक केले आहे. त्यानं गाण्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघाचे आणि संघातील खेळाडूंचे भरभरून कौतुक केले आणि याच गाण्यावर बुधवारी ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनला थिरकावे लागले. चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यानंतर ब्राव्होने नव्या गाण्यावर वॉटसनला थिरकण्यास भाग पाडले.
ब्राव्होच्या या गाण्यात भारताच्या विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या नावाचा उल्लेख विशेष ठरला. त्यांच्यासह शाहिद आफ्रिदी, शकीब अल हसन, रशीद खान, महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांचेही नाव आले. वॉटसन आणि सुरेश रैना यांनी चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवून दिला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईचा हा सलग दुसरा विजय ठरला. दिल्लीनं विजयासाठी ठेवलेले 148 धावांचे आव्हान चेन्नईने सहा विकेट्स राखून पार केले. शिखर धवनच्या ( 51) अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने 147 धावा चोपल्या. पृथ्वी शॉ आणि धवन यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली, परंतु चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला. ड्वेन ब्राव्होन 33 धावा देत दिल्लीचे 3 फलंदाज बाद केले. त्यामुळे दिल्लीला निर्धारीत 20 षटकांत 6 बाद 147 धावाच करता आल्या. मुंबई इंडियन्सविरुद्ध वादळी खेळी खेळणाऱ्या रिषभ पंतला ( 25) ब्राव्होने बाद केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना शेन वॉटसन ( 44) आणि सुरेश रैना ( 30) यांनी चेन्नईचा डाव सावरला. केदार जाधव ( 27) आणि धोनी ( 32) यांनीही दमदार खेळी करत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.सामन्यानंतर वॉटसन आणि ब्राव्हो यांच्यात संभाषण झाले आणि त्यावेळी दोघांनी डान्स केला.
पाहा संपूर्ण व्हिडीओ...
https://www.iplt20.com/video/155171