मुंबई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या पर्वातील जेतेपदाच्या लढतीत मुंबई इंडियन्सने बाजी मारली. मुंबईने थरराक सामन्यान चेन्नई सुपर किंग्सला अवघ्या एका धावेने हार मानण्यास भाग पाडले. पण, या सामन्यात चेन्नईला विजय मिळवून देण्यासाठी शेन वॉटसनने अखेरपर्यंत संघर्ष केला. डाव्या पायातून रक्तस्त्राव होत असूनही वॉटसन अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकून होता. संघाप्रती असलेल्या त्याच्या या योगदानाचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केले. आयपीएलच्या जेतेपदाबरोबर वॉटसनच्या या लढाऊ वृत्तीचेही भरभरून कौतुक झाले. चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाने वॉटसन भारावला आणि त्याने गुरुवारी त्यांच्यासाठी भावनिक मॅसेज पाठवला.
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम लढतीत वॉटसनने 59 चेंडूंत 80 धावांची खेळी केली. मुंबईने विजयासाठी ठेवलेल्या 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला एक धाव कमी पडली. मुंबईने त्यांना 7 बाद 148 धावांवर रोखले. मुंबईने किरॉन पोलार्डच्या ( 25 चेंडूंत नाबाद 41 धावा ) धडाकेबाज खेळीच्या जोरावर 8 बाद 149 धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला 7 बाद 148 धावांपर्यंतच मजल मारता आली. शेन वॉटसनने ( 80 धावा) एकाकी झुंज दिली. पण, अखेरच्या षटकात लसिथ मलिंगाने चेन्नईच्या तोंडचा घास पळवला आणि मुंबईचे चौथ्यांदा आयपीएलचा चषक उंचावला.
चेन्नईला विजय मिळवून देण्यासाठी अखेरपर्यंत संघर्ष करणारा वॉटसन हा दुखापरग्रस्त होता. त्याच्या डाव्यापायाच्या मांडीतून रक्तस्त्राव होत होते. पण तरीही तो संघासाठी खेळपट्टीवर उभा राहिला. चेन्नईचा फिरकीपटू हरभजन सिंगने ही गोष्ट अभिमानाने सर्वांना सांगितली. सामन्यानंतर वॉटसनच्या जखमेवर सहा टाके बसले. वॉटसनच्या या लढाऊ बाण्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
( पायातून रक्तस्त्राव होत असतानाही CSK ला विजय मिळवून देण्यासाठी त्याने अखेरपर्यंत दिली झुंज )