बंगळुरु, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सने अखेरच्या चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर विजय मिळवला. पण हा अखेरचा चेंडू नो बॉल असल्याचे सामन्यानंतर पाहायला मिळाले. हा नो बॉल असल्याचे बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला समजला आणि सामन्यानंतर कोहली चांगलाच वैतागेलला पाहायला मिळाला.
बंगळुरुला अखेरच्या चेंडूवर सात धावांची गरज होती. पण मलिंगाने या अखेरच्या चेंडूवर फक्त एकच धाव दिली. जर या चेंडूवर षटकार बसला असता तर सामना बरोबरीत सुटला असता आणि त्यानंतर एका षटकाचा सामना खेळवला गेला असता. पण अखेरच्या चेंडूवर एक धाव मिळाल्यावर मुंबईने विजयोत्सव साजरा केला. पण काही वेळातच हा अखेरचा चेंडू नो बॉल असल्याचे पाहायला मिळाले. कोहलीने सामना झाल्यानंतर मैदानात त्या नो बॉलविषयी विचारणा केली. पण तोपर्यंत सामन्याचा निकाल लागला होता आणि बंगळुरुचा पराभव झालेला होता.
अटीतटीच्या लढतीत अखेर मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर बाजी मारली. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने सहा धावांनी विजय मिळवला. मुंबईने बंगळुरुपुढे 188 धावांचे आव्हान ठेवले होते. एबी डि'व्हिलियर्स खेळपट्टीवर उभा असताना बंगळुरु हा सामना जिंकेल, असे वाटत होते. पण मलिंगाने अखेरच्या षटकात भेदक मारा केला आणि संघाला विजय मिळवून दिला.
बंगळुरुची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पण कर्णधार विराट कोहलीने 46 धावा करत संघाची गाडी रुळावर आणली. त्यानंतर एबी डि'व्हिलियर्सने तुफानी फटकेबाजी करत 41 चेंडूंत नाबाद 70 धावांची खेळी सकारली, पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.
मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले. या गोष्टीचा फटका मुंबईला बसला आणि त्यामुळेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात त्यांना 187 धावा करता आल्या. युजवेंद्र चहलने यावेळी चार विकेट्स मिळवत मुंबईच्या धावसंख्येला वेसण घातले. हार्दिक पंड्याने 14 चेंडूंत नाबाद 34 धावांची खेळी साकारल्यामुळे मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात आली.
विराट कोहलीच्या पाच हजार धावा पूर्णमुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली 46 धावांवर बाद झाला. विराटचे अर्धशतक यावेळी चार धावांनी हुकले. पण विराटने या सामन्यात आयपीएलमधील पाच हजार धावा पूर्ण केल्या.
यंदाचा आयपीएलचा हंगाम सुरु होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा सुरेश रैना की कोहली, कोण पाच हजार धावा पूर्ण करणार, याची उत्सुकता चाहत्यांना होती. पण रैनाने पहिल्याच सामन्यात पाच हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर आयपीएलमध्ये पाच हजार धावा करणारा कोहली हा दुसरा फलंदाज ठरला.