बंगळुरू, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील 'रॉयल' लढतीवर पावसाने पाणी फिरवलं. प्ले ऑफचे आव्हान कायम राखण्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात दोन्ही संघांना 1-1 गुणावर समाधान मानावे लागले. या सामन्यात निकाल लागावा याकरिता 5-5 षटकांची मॅचही खेळवण्यात आली, परंतु पावसाच्या दमदार बॅटिंगने सामना अखेरीस रद्द करावा लागला. यामुळे बंगळुरूच्या प्ले ऑफच्या आशा अखेरीस संपुष्टात आल्या, तर राजस्थान 11 गुणांसह पाचव्या स्थानी पोहोचले आहेत. त्यांचेही प्ले ऑफचे आव्हान जर तरच्या समीकरणावर अवलंबून आहे. एकूण 50 चेंडूंच्या या सामन्यात राजस्थानच्या श्रेयस गोपाळने हॅटट्रिक घेत विक्रमाला गवसणी घातली. आयपीएल कारकिर्दीतली त्याची ही पहिलीच हॅटट्रिक ठरली.
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बंगळुरू संघाच्या विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनी वरुण अॅरोनच्या पहिल्याच षटकात 23 धावा चोपल्या. त्यानंतर राजस्थानचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने फिरकी गोलंदाज श्रेयस गोपाळला पाचारण केले. त्याच्या पहिल्या तीन चेंडूंवर कोहलीनं षटकार, चौकार आणि दोन अशा एकूण 12 धावा चोपल्या. पण, गोपाळने एकाएकी सामन्याचे चित्रच पालटले. त्याने पुढील तीन चेंडूंत बंगळुरूच्या तीन स्फोटक फलंदाजांना माघारी पाठवले. त्याने कोहली, डिव्हिलियर्स आणि मार्कस स्टॉइनिस यांना बाद करताना हॅटट्रिक नोंदवली. पावसामुळे जवळपास 3 तासांचा खेळ वाया गेला.
एकाच सामन्यात कोहली आणि डिव्हिलिर्सला यांना बाद करण्याची गोपाळची ही तिसरी वेळ ठरली आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज आहे. राजस्थानकडून हॅटट्रिक नोंदवणारा तो चौथा गोलंदाज आहे. यापूर्वी अजित चंडिला ( वि. पुणे वॉरियर्स इंडिया, 2012), प्रविण तांबे ( वि. कोलकाता नाइट रायडर्स, 2014) आणि शेन वॉटसन ( वि. सनरायझर्स हैदराबाद, 2014) यांनी या पराक्रम केला आहे. गोपाळने 2018-19च्या सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 सामन्यात कर्नाटकचे प्रतिनिधित्व करताना हरयाणाविरुद्ध हॅटट्रिक नोंदवली.
पाहा व्हिडीओ... https://www.iplt20.com/video/183836
बंगळुरूने पाच षटकांत 7 बाद 62 धावा चोपल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 3.2 षटकांत 1 बाद 41 धावा केल्या. त्यानंतर पावसामुळे सामना रद्द करावा लागला.