मुंबई, आयपीएल 2019 : वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून लसिथ मलिंगाला राष्ट्रीय कर्तव्यावर बोलावणाऱ्या श्रीलंका क्रिकेट मंडळाने बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर ( बीसीसीआय) नमतं घेतलं. बीसीसीआयच्या दबावाला झुकून श्रीलंकन मंडळाने अखेरीस मलिंगाला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) खेळण्याची परवानगी दिली. श्रीलंकन मंडळाने मलिंगा आयपीएलच्या पहिल्या सहा सामन्यांसाठी उपलब्ध नसल्याचे सांगितले होते, परंतु बीसीसीआयने टीका केल्यानंतर त्यांनी यू टर्न मारला. त्यामुळे गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी मलिंगा मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. मलिंगाच्या येण्याने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची धार तीव्र झाली आहे. जसप्रीत बुमराहही पुर्णपणे तंदुरुस्त झाला आहे.
श्रीलंकन मंडळाने सांगितले की,''आयपीएल स्पर्धेत मलिंगाला खेळण्याची परवानगी देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यामुळे स्थानिक स्पर्धेत त्याला खेळण्याचे बंधन नाही. आयपीएलमध्ये त्याला आणखी तगड्या प्रतिस्पर्धींविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसाठी हे महत्त्वाचे आहे.''
दरम्यान, मलिंगाने पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो वन डे क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. दक्षिण आफ्रिकेनंतरच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातील पराभवानंतर मलिंगाने ही घोषणा केली. तो म्हणाला,''वर्ल्ड कपनंतर माझी कारकिर्द संपुष्टात येणार आहे. मला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळायचा आहे आणि त्यानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होईन.''