जयपूर, आयपीएल 2019 : सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यामध्ये आयपीएलचा सामना झाला होता. या सामन्यात 'चौकीदार चोर हैं' या घोषणा देण्यात आल्या होत्या. याबाबतचे वृत्त बीबीसी-हिंदी यांनी प्रसारीत केले आहे.
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर यंदाच्या हंगामातील हा पहिला सामना होता. या सामन्यात यजमान राजस्थानला पराभव पत्करावा लागला. या मॅचमधील एक २४ सेकंदांचा व्हिडीओ पहिल्यांदा वायरल झाला. या व्हिडीओमध्ये 'चौकीदार चोर है' अशा घोषणा देण्यात आल्याचे ऐकू येत आहे.
हा पाहा खास व्हिडीओ
जयपूरमध्ये राजस्थान आणि पंजाब यांच्यातील सामना रात्री आठ वाजता सुरु झाला. या सामन्यात पंजाबच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. पंजाबच्या ख्रिस गेलने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी केली. पंजाब फलंदाजी करत असताना १४व्या षटकात पहिल्यांदा स्टेडियममध्ये स्पीकरवरून 'जीतेगा भई जीतेगा!', अशी अनाउंसमेंट करण्यात आली. त्यानंतर प्रेक्षकांनी 'राजस्थान जीतेगा', असा त्याला प्रतिसाद दिला. त्यानंतर १५ आणि १७व्या षटकात पुन्हा अशीच गोष्ट पाहायला मिळाली. सामन्याच्या १८व्या षटकातील पहिला चेंडू जयदेव उनाडकटने टाकला तेव्हा नॉर्थ स्टँडमधून मोदी-मोदी, अशा घोषणा सुरु झाल्या. या षटकामध्ये निकोलस पूरनने जेव्हा चौकार लगावला तेव्हा चौकीदार चोर है', ही घोषणा देण्यात आली. त्यावेळी चौकीदार चोर है', ही घोषणा तब्बल पाच वेळा देण्यात आली. हॉट-स्टारच्या अधिकृत वेबसाइटवर या घोषणा ऐकायला मिळू शकतात. तुम्ही जर बेवसाईटवर गेलात, तर या सामन्याच्या २ तास ३० मिनिटांनी तुम्ही या घोषणा ऐकू शकता. हा सामना पाहणाऱ्या २३ वर्षीय जयंत चौबे याने देखील यावृत्ताला दुजोरा दिला आहे.
उनाडकटने १८व्या षटकाचा दुसरा चेंडू टाकला. पंचांनी तो वाईड असल्याचे सांगितले. त्यानंतर उनाडकट पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी माघारी परतत असताना स्टेडियममध्ये ' चौकीदार चोर हैं'चा नारा सुरु झाला. त्यानंतर उनाडकट तिसरा चेंडू टाकेपर्यंत स्टेडियमधील चाहत्यांनी तब्बल पाच वेळा 'चौकीदार चोर हैं'चा नारा दिला.